coronavirus: वादग्रस्त रिपोर्ट देणाऱ्या लॅबला दणका, टेस्टिंग थांबवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 03:53 AM2020-05-11T03:53:21+5:302020-05-11T03:53:40+5:30
आयसीएमआरने कोविड-१९ साठी अधिकृत घोषित केलेली थायरोकेअर या लॅबच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रातील कोविड १९ ची टेस्ट केली जात होती. त्यासाठी लॅबला विशेष परवानगी देण्यात आली होती.
- वैभव गायकर
पनवेल : पनवेलमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दोनशेवर गेला आहे. महापालिकेकडून प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यातच चुकीचे रिपोर्ट दिल्याची तक्रारी थायरोकेअर या लॅबसंदर्भात प्राप्त होताच पनवेल महापालिका
क्षेत्रातील कोविड-१९ चे स्वॅब टेस्ट घेण्यास लॅबला मनाई करण्यात आली आहे.
आयसीएमआरने कोविड-१९ साठी अधिकृत घोषित केलेली थायरोकेअर या लॅबच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रातील कोविड १९ ची टेस्ट केली जात होती. त्यासाठी लॅबला विशेष परवानगी देण्यात आली होती.
मात्र, लॅबच्या माध्यमातून चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले गेल्याने पनवेल महापालिका आयुक्तांनी संबंधित लॅबला पालिका क्षेत्रातील कोविड-१९ ची चाचणी करण्यास मनाई केली आहे.
९ मे थायरोकेअर लॅबच्या संचालकांना आयुक्तांनी पत्र पाठवून पालिका क्षेत्रात काम करण्यास मनाई केली आहे. शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनीही यासंदर्भात स्थायी समितीमध्ये विषय उपस्थित केला होता. चुकीचा रिपोर्ट
दिल्याने तळोजामधील एका कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा
लागला होता. यासंदर्भात
आयुक्तांनी दखल घेऊन कारवाई केली आहे.
२४ तासात कोविड-१९ चे रिपोर्ट येणे अपेक्षित असतानाही ७२ तासापेक्षा जास्त वेळ कोविडचे अहवाल दिले गेले नसल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
दोन वेळा चुकीचे रिपोर्ट दिले गेल्याचे आयुक्तांनी लॅबला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
थायरोकेअर लॅबच्या माध्यमातून वादग्रस्त व वेळेवर रिपोर्ट दिले जात नसल्याचे निष्पन्न झाल्यावर संबंधित लॅबचे काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका