नवी मुंबई : कोरोनाविषयी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. वाशीतील इनऑर्बिट व सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉल व्यवस्थापनाकडून प्रत्येकी ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे. शहरातील सात बार व रेस्टॉरंट व्यवस्थापनाकडूनही दंड वसूल करण्यात आला असून यापुढेही नियम धाब्यावर बसविणारांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी सायंकाळी व शनिवार, रविवारी मॉल्स व डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये कोरोना चाचणी करणाऱ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. परंतु अनेक मॉल्समध्ये चाचणी न करता प्रवेश दिल्याचे निदर्शनास आले आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शनिवारी अचानक सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉलला भेट दिली. तेथील प्रवेशद्वारावरील कोरोना चाचणी व इतर उपाययोजनांचा आढावा घेतला. पाहणी करताना पालिकेच्या पथकाला चाचणी न झालेल्या नागरिकांनाही आतमध्ये प्रवेश दिल्याचे निदर्शनास आले. यामुळे मॉल व्यवस्थापनाकडून ५० हजार रुपये दंड वसूल केला. वाशीतील इनऑर्बिट मॉलला ही अचानक भेट देण्यात आली. तेथील चाचणी न करताच काही नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश दिल्याने तेथेही ५० हजार रुपये दंड वसूल केला. हॉटेल चालकांकडून मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यामुळे पालिकेने नियम तोडणारांविरोधात मोहीम सुरू केली आहे. कल्पना बार, साई हॉटेल आणि बार, पोटोबा फास्ट फूड, बेलापूरमधील रूड लंग बार, सानपाडामधील कृष्णा बार, कोपरखैरणेमधील क्लासिक रेस्टॉरंट आणि बार, समुद्र रेस्टॉरंट आणि बार अशा सात बार व्यवस्थापनाकडून प्रत्येकी ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे.
कारवाई सुरूच राहणार कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी व सर्व व्यवसायिकांनीही नियमांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. नियमांचे पालन केले नाही तर कारवाई सुरूच राहणार असल्याचेही महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.