नवी मुंबई - देशभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवी मुंबईतील गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश पालिकेने काढले आहेत. यामुळे शनिवारी शहरातील चित्रपटगृहे, तरणतलाव यासह काही मॉल्समध्येही शुकशुकाट पसरला होता.नवी मुंबईत अद्यापही कोरोनाबाधित संशयित एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र गर्दीच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या अज्ञात व्यक्तींकडून त्याचा नकळत प्रसार होऊ शकतो. ही बाब टाळण्यासाठी मुंबई व पुण्यासह नवी मुंबईतील गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीची घोषणा करताच रात्री उशिरा महापालिकेने त्यासंबंधीचे आदेश जाहीर केले आहेत.यानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहरातील सर्व चित्रपटगृहे, तरणतलाव, नाट्यगृहे, व्यायामशाळा यासह इतर सार्वजनिक गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यास विविध व्यावसायिक संघटनांकडून प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे शनिवारी काही ठिकाणच्या मॉलमधील तुरळक गर्दी वगळता इतर सर्वच ठिकाणी शुकशुकाट पसरला होता. तर चित्रपटगृहे बंद ठेवल्यामुळे त्या दिवसाचे सर्व शो रद्द करण्यात आले. त्यासाठी अगोदरच बुकिंग असलेल्या प्रेक्षकांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे शहरातील सर्वच चित्रपटगृहांबाहेर सुरक्षारक्षकांव्यतिरिक्त कोणीही पाहायला मिळाले नाही. तर सुरक्षारक्षकांकडूनही खबरदारी म्हणून मास्कचा वापर करूनच गस्त घातली जात आहे. शहरातील खासगी तसेच व्यावसायिक तरणतलावांमध्येही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. व्यायामशाळांमध्येही जमण्यास बंदी घालण्यात आल्याने अनेक व्यायामशाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.आठवड्याचा शेवटचा व सुट्टीचा दिवस असल्याने प्रत्येक शनिवारी व रविवारी मॉल्स व चित्रपटगृहांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी असते. परंतु गर्दीच्या ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोणताही संसर्गजन्य आजार पसरण्याचा अधिक धोका असतो. त्यात जगभरात गतीने पसरत असलेल्या कोरोनाबाबत केंद्र व राज्य सरकारही गंभीर झाले आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पालिकेने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. त्याकरिता सर्वच प्रकारच्या गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचेही आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्राथमिक शाळांना शासनाकडून सुट्टी देण्यात आली आहे. परंतु नवी मुंबईत मात्र शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलेली नाही. यामुळे शाळा सुरूच असल्याने मास्क वापरून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले जात आहे. काही शाळांनी मात्र कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता शाळांना काही दिवसांची सुट्टी घोषित केली आहे. यादरम्यान एखाद्या व्यक्तीला व्हायरसची लागणझाल्याचा संशय आल्यास चाचणीसाठी पालिकेने रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्थाही उभारली आहे.एनएमएमटीमधून प्रवासी वाहतूक केली जात असताना चालक व वाहकांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने एनएमएमटीच्या चालक व वाहकांना हँड ग्लोव्हज् व मास्क तसेच इतर आवश्यक साधने पुरवण्याची मागणी माजी परिवहन सदस्य विसाजी लोके यांनी केली आहे.त्याशिवाय पालिकेकडून गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधीची आवश्यक जनजागृती करण्याचीही मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे.नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंदकरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १३ मार्चपासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तशा अशायचे परिपत्रक महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी जारी केले आहे. तर दहावी व बारावीच्या परीक्षा तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी, असेही सूचित केले आहे. शहरातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालय, बालवाडी, अंगणवाडी संस्थांनी ३१ मार्चपर्यंत या निर्देशाचे पालन करण्याचे आवाहन आयुक्त मिसाळ यांनी केले आहे.अन्नधान्य साठ्यावर भरजगभरातील कोरोनाची स्थिती पाहता नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता त्यांच्याकडून खबरदारी घेतली जात आहे. परिचित व्यक्तींसोबतचाही संपर्क अनेकांनी टाळला आहे. तर येत्या काळात काय परिस्थिती उद्भवेल याचा अंदाज नसल्याने अनेकांनी नियमित वापराचे सहित्य व किराणा यांचा अतिरिक्त साठा करून ठेवण्यावरही भर दिला आहे.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व संशयित रुग्णांची ओळख पटवण्याच्या खबरदारीसाठी पालिका मुख्यालयात डॉक्टरांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास निमा व हिम्पाम या दोन्ही संघटनांचे २०० हून अधिक डॉक्टर उपस्थित होते.त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र हिम्पामचे अध्यक्ष डॉ. एस. टी. गोसावी, नवी मुंबई हिम्पामचे अध्यक्ष डॉ. प्रतीक तांबे, निमाचे नवी मुंबई अध्यक्ष डॉ. विनायक म्हात्रे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. उज्ज्वला ओतुरकर आदी उपस्थित होते.
Coronavirus : सार्वजनिक ठिकाणी शुकशुकाट! कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाची खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 2:09 AM