Coronavirus: नवी मुंबईत २५ वर्षांनंतर प्रशासकीय राजवट; शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 02:01 AM2020-05-09T02:01:59+5:302020-05-09T02:02:17+5:30
सध्या शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना पुन्हा एकदा प्रशासकांची नियुक्ती झाली आहे
नामदेव मोरे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे सहावे प्रशासक म्हणून अण्णासाहेब मिसाळ यांनी पदभार स्वीकारला आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या पावणेतीन वर्षांसाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. याच कालावधीमध्ये मनपाच्या विकासाची व आरोग्यसेवेचीही पायाभरणी करण्यात आली होती. २५ वर्षांनंतर पालिकेत पुन्हा एकदा प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून ते कसे पेलणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे आयुक्त मिसाळ यांनी शुक्रवारपासून प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. १९९२ मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतर आर. सी. सिन्हा यांनी पहिले प्रशासक म्हणून कामकाज पाहिले. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेले नवी मुंबई हे देशातील एकमेव शहर. मूळ गावठाण, सिडको विकसित नोड, एमआयडीसी व नव्याने उभ्या राहणाऱ्या झोपडपट्ट्या असे चित्र शहरात होते. काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा व निधीचाही अभाव होता. अशा परिस्थितीत प्रशासकांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासास सुरुवात केली.
सुरुवातीच्या चार प्रशासकांना फारसा वेळ मिळाला नाही. एम. रमेश कुमार यांची सप्टेंबर १९९२ ला प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. ते मे १९९५ पर्यंत पदावर होते. याच काळात नवी मुंबईमधील आरोग्य रचनेचा पाया घालण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालय व वाशीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय अशी आरोग्य विभागाची रचना करण्याचे निश्चित करण्यात आले. आजही तीच रचना कायम आहे. सुरुवातीला पावणेतीन वर्षांत प्रशासकांनी विकासाचा पाया मजबूत केल्याने पुढील २५ वर्षांत विकासाचे अनेक टप्पे पार करणे शक्य झाले.
सध्या शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना पुन्हा एकदा प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. सर्वाधिकार आयुक्तांकडे एकवटले आहेत. कोरोनाशी लढताना जलद गतीने निर्णय घेणे शक्य होणार आहे. प्रस्ताव तयार करणे, मंजुरी देणे, निविदा मागविणे व निविदांना तत्काळ मंजुरी देणे शक्य होणार आहे.
स्थापनेपासूनचे प्रशासक
- आर. सी. सिन्हा - १ जानेवारी १९९२ ते २ ऑगस्ट १९९२
- राजीव अग्रवाल - ३ ऑगस्ट १९९२ ते ३१ ऑगस्ट १९९२
- शंकर मेनन - १ सप्टेंबर १९९२ ते ६ सप्टेंबर १९९२
- आर. सी. सिन्हा - ७ सप्टेंबर १९९२ ते २७ सप्टेंबर १९९२
- एम. रमेश कुमार - २८ सप्टेंबर १९९२ ते २० मे १९९५
- अण्णासाहेब मिसाळ - ८ मे २०२० पासून पुढे
कोरोना तपासणी प्रयोग शाळा हवी
चार ते पाच दिवस अहवाल येत नाहीत, यामुळे नवी मुंबईत तपासणी प्रयोग शाळा सुरू करण्यात यावी. २४ तासांच्या आतच तपासणी अहवाल मिळावा. जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी व्हावी व उपचारापासून कोणीही वंचित राहू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात
आहे.