coronavirus: कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:15 AM2020-05-11T02:15:20+5:302020-05-11T02:15:56+5:30
नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सहाशेच्या घरात गेला आहे. विशेष म्हणजे, एपीएमसीतील कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे.
नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील पाचही मार्केट सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारी फळे आणि भाजीपाला व्यापाऱ्यांनी शिल्लक मालाची विक्री करण्यावर भर दिला. रविवारचा सुट्टीचा दिवस असतानाही व्यापारी आणि विक्रेत्यांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून आले.
नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सहाशेच्या घरात गेला आहे. विशेष म्हणजे, एपीएमसीतील कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. तर शहरातील एकूण रुग्णांपैकी जवळपास २४५ रुग्ण एपीएमसी मार्केटशी संबंधित आहेत. राज्य शासनाने सोमवारपासून १७ मेपर्यंत बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर पुरेल इतका अन्नधान्य आणि भाज्यांचा पुरवठा मुंबई शहराला करण्याच्या सूचना राज्य शासनाने एपीएमसी प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार शनिवार जीवनावश्यक वस्तूंंच्या एक हजार गाड्या मुंबईला रवाना झाल्या होत्या. तर रविवारी कृषिमालाच्या ६२१ गाड्या एपीएमसीतून बाहेर गेल्या आहेत. यात भाजीपाला १५५, कांदा-बटाटा १४, फळे ११२, मसाला १०५ आणि अन्नधान्याच्या २३५ गाड्यांचा समावेश आहे. बाजारपेठा बंद राहणार असल्या तरी भाजीपाला, फळे आणि कांदा बटाटा यांचा थेट पुरवठा किरकोळ बाजारात होणार आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस भाजीपाल्यांची कमतरता जाणवणार नसल्याचे एपीएमसी प्रशासनाने स्पष्ट आले आहे. दरम्यान, सोमवारपासून बाजारपेठा बंद राहणार असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी भाज्या आणि फळे खरेदीसाठी बाजारपेठेत रविवारी गर्दी केल्याचे दिसून आले.
स्थानिक बाजारात गर्दी
एपीएमसी मार्केट सोमवारपासून बंद राहणार असल्याच्या भीतीने नागरिकांनी रविवारी स्थानिक बाजारपेठेत गर्दी केली. आठवडाभर पुरेल इतका भाजीपाला, फळे खरेदी करण्यावर अनेकांनी भर दिला. प्रत्येक नोडमध्ये तसेच मोकळ्या जागेत भरणाºया बाजारात गर्दी होती. या वेळी सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होताना दिसली. अन्नधान्य व भाजीपाल्याच्या तुटवड्याच्या भीतीने नागरिक कोरोनापासून बचावाकडे दुर्लक्ष होताना दिसले.