नामदेव मोरे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शंभर रुग्णांचा टप्पा पार करण्यासाठी ४२ दिवसांचा कालावधी लागला. दुसरे शतक पाच व तिसरे शतक चारच दिवसांत पूर्ण झाले आहे. शहरातील आठही विभाग रेड झोनमध्ये गेले असून कोपरखैरणेसह एपीएमसीतील स्थिती गंभीर आहे. महापालिका व पोलिसांनी कठोर उपाययोजना केल्या नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईमध्ये १३ मार्चला वाशीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलिपाइन्सवरून आलेल्या एका व्यक्तीस प्रथम लागण झाली. राज्यातील मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, पुणे व सांगलीच्या तुलनेत नवी मुंबईमध्ये रुग्णवाढीचा वेग कमी होता. परंतु अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत जाणाऱ्या डॉक्टर, नर्स, बेस्ट कर्मचारी व इतरांमुळे शहरातील रुग्ण मोठ्या संख्येने वाढले.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल अखेरपर्यंत मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमुळे नवी मुंबईत ६३ टक्के रुग्ण वाढले आहेत. एमआयडीसीतील एक कंपनीत तब्बल २१ रुग्ण आढळल्यामुळे सर्वांना धक्का बसला. रुग्णांच्या संपर्कातील अनेकांना लागण झाली. बेलापूर व वाशीतील दोन ठिकाणी एकाच घरात सरासरी सात रुग्ण आढळले. अनेक घरांमध्ये चार ते पाच जणांना लागण झाली.नवी मुंबईमध्ये शंभर रुग्णांचा टप्पा पार करण्यासाठी तब्बल ४२ दिवस लागले होते. मुंबई, ठाणे, पुणेमध्ये यापेक्षा कमी कालावधीत रुग्ण वाढले होते. सुरुवातीच्या दीड महिन्यात परिस्थिती नियंत्रणात होती. परंतु २४ एप्रिलनंतर कोरोनाने धुमाकूळ घातला. दुसरे शतक २९ एप्रिलला म्हणजे फक्त पाच दिवसांत पूर्ण झाले. त्यानंतर ३ मे रोजी चौथ्या दिवशीच तिसरे शतकही पूर्ण झाले आहे. सर्वाधिक रुग्ण कोपरखैरणेत तर सर्वात कमी रुग्ण दिघामध्ये आढळले आहेत. एपीएमसीत कोरोनाने शिरकाव केला असून प्रशासनाने कठोर भूमिका घेतली नाही तर पुढील काही दिवसांत नवी मुंबईची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणारांची संख्या वाढली आहे. अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांची विशेषत: दुचाकींची संख्या वाढली आहे. सायंकाळी शतपावलीसाठी अनेक जण घराबाहेर पडत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.संपूर्ण पनवेल रेड झोनमध्येपनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिका क्षेत्र व संपूर्ण पनवेल तालुका ‘रेड झोन’ म्हणून घोषित केल्याचे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. राज्य शासनाच्या २ मे रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रायगड जिल्हा हा आॅरेंज झोनमध्ये येत आहे. मात्र पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, रेड झोनबाबत शासनाने दिलेले सर्व निर्देश पनवेल महापालिका क्षेत्र व संपूर्ण पनवेल तालुक्यासाठी लागू राहतील, असे चौधरी यांनी घोषित केले आहे.