नवी मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळून आलेल्या परिसराला महापालिकेच्या माध्यमातून कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला जातो. नागरिकांच्या माहितीसाठी या परिसरात बॅनरदेखील लावले जातात १४ दिवसांनंतर रुग्णसंख्या कमी झाली असल्यास सदर परिसर कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात येतो. नवी मुंबई शहरातील अनेक परिसरांना कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आले आहे. परंतु बॅनर काढण्याचा विसर महापालिकेला पडला असून यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम पसरलेला आहे.नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुमारे चार हजारांच्या पुढे गेली असून उपचारानंतर सुमारे दोन हजार ३00 व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. मार्च महिन्यापासून शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले होते. १४ दिवसांनंतर या परिसरातील कोरोनाबाधित व्यक्ती बºया झाल्यावर या परिसरांमधील कंटेनमेंट झोन उठविण्यात आले. कंटेनमेंट झोन जाहीर झाल्यावर सदर सोसायटी, इमारतीच्या प्रवेशद्वारावर महापालिकेच्या माध्यमातून बॅनर लावले गेले होते. तसेच रुग्ण आढळलेल्या संबंधित सोसायटीला पत्रदेखील देण्यात येते. रुग्ण बरे झाल्यावर किंवा नव्याने रुग्ण न आढळल्यास १४ दिवसांनंतर या परिसराला कंटेनमेंट झोनमधून वगळले जाते. परंतु त्यानंतर अनेक ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर, बांबू काढण्याचा प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून आले आहे.
CoronaVirus News: शहरात कंटेनमेंट झोनचे बॅनर ‘जैसे थे’; नागरिकांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:16 AM