Coronavirus: सिडको प्रदर्शन केंद्रात केअर सेंटर; १२०० बेडचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 02:08 AM2020-05-06T02:08:37+5:302020-05-06T02:08:47+5:30

नेरूळमधील तेरणामध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालयाचे नियोजन

Coronavirus: CIDCO Display Center Care Center; Planning of 1200 beds | Coronavirus: सिडको प्रदर्शन केंद्रात केअर सेंटर; १२०० बेडचे नियोजन

Coronavirus: सिडको प्रदर्शन केंद्रात केअर सेंटर; १२०० बेडचे नियोजन

googlenewsNext

नवी मुंबई : वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १२०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. तेरणा रुग्णालयात १०० बेडचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय व रिलायन्स हेल्थ सेंटरमध्ये ६० बेडचे केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त आहे. वाढती संख्या लक्षात घेता, उपचार मिळवून देण्यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड रुग्णालय अशा प्रकारे त्रिस्तरीय रुग्णालय व्यवस्था शहरात केली जात आहे. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मंगळवारी, वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या अनुषंगाने पाहणी केली. या वेळी शहर अभियंता सुरेंद्र पाटील व उपआयुक्त अमरीश पटनिगिरे उपस्थित होते. प्रदर्शन केंद्रात दोन स्वतंत्र कक्षांत अंदाजे १२०० बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामधील एका कक्षात स्वॅब सॅम्पल टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या व सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोविड-१९ बाधितांवर स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार आहेत. दुसऱ्या कक्षात कोरोना पॉझिटिव्ह नागरिकाच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाइन केलेल्या संशयित नागरिकांना ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी आवश्यक असलेल्या स्नानगृहे व स्वच्छतागृहांची व्यवस्था मॉड्युलर स्वरूपात त्वरित तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला दिले.

घणसोलीतील रिलायन्स कॉर्पोरेट आय.टी. पार्कमध्ये मेडिकल अ‍ॅण्ड आॅक्युपेशनल हेल्थ सेंटरमध्ये कोविड केअर सेंटरकरिता १२० बेड्स असणार असून त्यामधील ६० बेड्स महापालिका कोरोनासंदर्भित व्यक्तींसाठी राखीव असतील. येथे महापालिकेमार्फत कामकाज नियंत्रणासाठी नोडल आॅफिसर म्हणून डॉ. वरुण घिलडियाल यांची नियुक्ती केली आहे. सद्य:स्थितीत वाशी सार्वजनिक रुग्णालयात १३० बेड्सचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय कार्यान्वित असून नेरूळ येथील तेरणा रुग्णालयात पहिल्या टप्प्यात १०० बेड्सचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी कामकाज नियंत्रणासाठी नोडल आॅफिसर म्हणून डॉ. रुषिभा जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड-१९ नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाबाधित व्यक्तींवर योग्य उपचार व्हावेत व कोणताही रुग्ण वैद्यकीय उपचारांशिवाय राहू नये याकरिता वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतले जात आहेत. नागरिकांनीही कोरोनाचा प्रसार रोखून शहर कोरोनामुक्त करण्यासाठी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे व घरातच थांबून सहकार्य करावे. - अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Web Title: Coronavirus: CIDCO Display Center Care Center; Planning of 1200 beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.