नवी मुंबई - नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बेसमेंट मध्ये 75 आयसीयू बेडसची सुविधा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय या कोविड केंद्रात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा राहत असल्याने हे कोविड केंद्र आता स्वयंपूर्ण होणार आहे. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कोविड केअर केंद्राला भेट देऊन नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधेची पाहणी केली.
नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे यापूर्वी सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये 1200 बेडसचे कोविड केंद्र यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र या सुविधेत आयसीयू बेडसचा समावेश नव्हता. त्यामुळे रुग्णाची वाढती संख्या आणि जास्तीत जास्त पेशंट्सना आयसीयू बेडसची गरज असल्याने सिडको केंद्राच्या आवारातच या 75 आयसीयू बेडसची सोय नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या नवीन सुविधेमुळे पेशंटला दूरच्या रुग्णालयात हलवण्यापेक्षा सिडको केंद्राअंतर्गतच त्याच्यावर पुढील उपचार करणे शक्य होणार आहे. रुग्ण हलवताना त्याच्या जीवाला होणारा धोका देखील त्यामुळे टळण्यास मदत होईल. यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने लवकरच येथे पोर्टेबल ऑक्सिजन जनरेशन प्लँट देखील उभारण्यात येणार असून, त्याद्वारे हे केंद्र पूर्णपणे स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं.
सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये नव्याने सुरू झालेले 75 आयसीयू बेडस आणि पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात सुरू झालेले 100 आयसीयू बेडस असे 175 आयसीयू बेडस आता रुग्णांसाठी उपलब्ध झाले असून त्याचा वापर देखील सुरू झालेला आहे. याशिवाय एकूण 3000 ऑक्सिजन बेडसही महानगरपालिकेकडून उपलब्ध करून दिल्यामुळे नवी मुंबई परिसरातील नागरिकांसाठी हा फार मोठा दिलासा ठरणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी या पाहणीवेळी उपस्थित होते.