CoronaVirus: कोरोनाच्या लढ्यात प्रशासन सज्ज, नागरिक बेशिस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 01:23 AM2020-04-25T01:23:10+5:302020-04-25T01:23:27+5:30

चोवीस तास यंत्रणा सक्रिय; नवी मुंबईत प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित

CoronaVirus: Corona administration ready to fight, citizens unruly | CoronaVirus: कोरोनाच्या लढ्यात प्रशासन सज्ज, नागरिक बेशिस्त

CoronaVirus: कोरोनाच्या लढ्यात प्रशासन सज्ज, नागरिक बेशिस्त

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन दिवसरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. बेघर नागरिकांना निवारा, जेवण दिले जात आहे. शहरात औषध फवारणी सुरू आहे. परंतु नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करत नसल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने घरातच थांबून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स निर्माण केला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची अडचण होऊ नये, यासाठी एनएमएमटीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रुग्णालय, महापालिका, पोलीस, अग्निशमन, महावितरण, बँका, औषध कंपन्या, प्रसारमाध्यमे, टेलिफोन व इंटरनेट सेवेतील कर्मचाºयांना परिवहनची सुविधा देण्यात आली आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने रात्री रेल्वे स्थानक परिसर, डेपो, नागरिकांची वर्दळ असणारी ठिकाणे यांचे अत्याधुनिक जेटिंग मशीनद्वारे सफाई केली जात आहे. गाव-गावठाण, झोपडपट्टी भागात जंतुनाशक फवारून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनामार्फत निर्जंतुकीकरणासाठी अत्याधुनिक बूम स्प्रेशर शक्तिमान वाहन कार्यरत करण्यात आले आहे.

भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सोसायटीपर्यंत भाजीपाला पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. शहरातील होम क्वारंटाइन नागरिकांचा आकडा दोन हजारांहून अधिक आहे. क्वारंटाइन सुरू असलेल्या व्यक्तींचे निरीक्षण व नियंत्रण तसेच त्यांच्या संपर्काच्या दृष्टीने 'कोव्हिगार्ड' हे विशेष मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडतो, त्या परिसरातील नागरिकांचा आरोग्यविषयक सर्व्हे करण्याकरिता 'कोव्हिकेअर' हे आणखी एक विशेष मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.

रुग्णालयीन यंत्रणेचे सक्षमीकरण
महापालिकेने शहरात रुग्णालयीन यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे. बहुउद्देशीय इमारत, सेक्टर १४, वाशी (१३४ बेड्स), इंडिया बुल्स, कोनसावळे, पनवेल (५०० बेड्स कार्यान्वित अधिक ५०० बेड्सचे नियोजन), एमजीएम सुपर स्पेशालिटी रुग्णालय, वाशी (२०० बेड्स) या ३ ठिकाणी ‘कोविड केअर सेंटर’ स्थापन करण्यात आली आहे. हिरानंदानी फोर्टिस रुग्णालय, वाशी (४० बेड्स), डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, नेरूळ (१०० बेड्स), रिलायन्स रुग्णालय, कोपरखैरणे (२० बेड्स) या ठिकाणी ३ डेडिकेटेड ‘कोविड हेल्थ सेंटर’ स्थापन करण्यात आली आहेत. येथे मध्यम स्वरूपातील कोविड १९ बाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. नवी मुंबई महापालिका रुग्णालय, वाशी येथे डेडिकेटेड कोविड रुग्णालय (१२० बेड्स) स्थापित करण्यात आले आहेत.

पालिकेची २७ क्लिनिक
शहरात अनेकांना साधा सर्दी, खोकला अथवा ताप असल्याचे आढळून येत असून यावर तत्काळ उपाययोजनेचा भाग म्हणून महापालिकेची ४ रुग्णालये तसेच २३ नागरी आरोग्य केंद्रे या ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ‘फ्ल्यू क्लिनिक’ सुरू करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी प्रामुख्याने ताप, सर्दी, घशात खवखव, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळणाºया नागरिकांची तपासणी केली जात आहे. याशिवाय बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी) कार्यान्वित ठेवण्यात आलेली आहे.

Web Title: CoronaVirus: Corona administration ready to fight, citizens unruly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.