coronavirus: कोरोनामुळे दुरावतायेत नाती, चाकरमान्यांना ‘गावबंदी’चा धसका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:37 AM2020-05-14T00:37:41+5:302020-05-14T00:38:41+5:30
लॉकडाउनमुळे नोकरी-व्यवसाय बंद असल्याने एकाकी पडलेल्या चाकरमान्यांपुढील अडचणी वाढतच आहेत. त्यामुळे बॅचलर राहणारे, विद्यार्थी, तसेच उदरनिर्वाहाचे साधन न राहिलेले कुटुंबासहगावाकडे धाव घेण्यास इच्छुक आहेत; परंतु अनेक गावांनी मुंबईकरांसाठी सीमा बंद केल्या आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : राज्याच्या अनेक भागांमध्ये अद्यापही मुंबई व पुणेकरांना प्रवेशबंदी केली जात आहे. असाच प्रकार जावळी भागात सुरू असल्याने अनेक जण नवी मुंबईसह मुंबई परिसरात अडकून पडले आहेत. त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा कठीण प्रश्न असल्याने गावच्या वेशी खुल्या करण्याची मागणी होत आहे.
लॉकडाउनमध्ये अडकलेल्यांना स्थलांतराची संधी देऊनही पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जण गावाकडे पोहोचू शकले नाहीत. अनेक गावांमध्ये मुंबईमधून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. लॉकडाउनमुळे नोकरी-व्यवसाय बंद असल्याने एकाकी पडलेल्या चाकरमान्यांपुढील अडचणी वाढतच आहेत. त्यामुळे बॅचलर राहणारे, विद्यार्थी, तसेच उदरनिर्वाहाचे साधन न राहिलेले कुटुंबासहगावाकडे धाव घेण्यास इच्छुक आहेत; परंतु अनेक गावांनी मुंबईकरांसाठी सीमा बंद केल्या आहेत.
गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने अटी व शर्तींसह त्यांना गावाकडे जाण्याची सवलत दिली आहे. त्यानंतरही अनेक ग्रामपंचायतींनी बैठक घेऊन मुंबई पुण्याकडील व्यक्तींना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर या तुघलकी निर्णयाविरुद्ध जाणाऱ्यांना कायमच वाळीत टाकण्याचे धमकावले जात आहे. त्याचा धसका नवी मुंबईसह मुंबई, पुण्याच्या नोकरी-व्यवसाय निमित्ताने वास्तव्याला असलेल्या चाकरमान्यांनी घेतला आहे. त्यांना लॉकडाउनमुळे शहरात जगणे असह्य झाले असून, इच्छा असतानाही गावाकडे जाता येत नाहीये. त्यामुळे एका व्हायरसमुळे माणसा माणसात निर्माण झालेली दरीही दिसून येत आहे.
असाच प्रकार जावळी तालुक्यात समोर आला आहे. तिथल्या काही गावांनी अद्यापही मुंबई-पुण्याच्या लोकांसाठी गावच्या वेशी बंद ठेवल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणेत राहणाºया इंजिनीयर तरुणाने घरच्यांपासून दुरावल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा तरुणही जावळी तालुक्यातीलच असल्याने मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांसाठी प्रवेश बंद करणाºया गावांनी या घटनेपासून धडा घेण्याची गरज आहे. शिवाय त्याची पुनरावृत्ती टाळली पाहिजे.
गावाची दारे खुली करण्याची मागणी
सध्या जावळी परिसरातील हजारो नागरिक नवी मुंबईत स्थायिक असून, केवळ ग्रामपंचायतींच्या आडमुठ्या धोरणामुळे अडकून पडले आहेत. त्यांना गावचा दरवाजा खुला करण्याची मागणी करूनदेखील अनेक ग्रामपंचायती नवी मुंबई, मुंबई व पुणेच्या नागरिकांना प्रवेश देत नसल्याचे मूळचे वाईचे सध्या जुईनगरचे रहिवासी अजय मोरे यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी सातारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.