coronavirus: कोरोनामुळे परराज्यातील कामगारांची गावाकडे धाव, नवी मुंबईतील एपीएमसी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:17 AM2020-05-13T00:17:01+5:302020-05-13T00:18:25+5:30
परराज्यातील कामगारांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. खासगी बस, ट्रक अथवा टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचा प्रयत्न होत आहे.
नवी मुंबई : कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. नवी मुंबईतील वाशी एपीएमसीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने मार्केट बंद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे परराज्यातील कामगारांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. खासगी बस, ट्रक अथवा टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचा प्रयत्न होत आहे. आपण येथे राहिलो तर कोरोनाचे बळी ठरू, अशी भीती या कामगारांच्या मनात आहे.
शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाचही मार्केटमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील कामगारांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणच्या कामगारांचा सर्वाधिक समावेश आहे. पराज्यातील हे बहुतांश कामगार भाजी व फळ मार्केट आवारात काम करणारे आहेत.
लॉकडाउनमध्ये त्यांना मूळ गावी पाठवण्यासाठी पोलिसांकडून त्यांची नोंदणीदेखील करण्यात आलेली आहे. त्यानुसार काही कामगारांना रेल्वने पाठवण्यात आले आहे. परंतु अनेकांना गावाची ओढ लागल्याने ते रेल्वेची प्रतीक्षा न करता बस, ट्रक, टेम्पोमधून प्रवास करत आहेत.
पोलिसांची नजर चुकवून प्रवास
मंगळवारी तुर्भे येथे ट्रक व टेम्पो भरून हे कामगार राज्यभर जाण्याच्या प्रयत्नात दिसून आले. सोशल डिस्टन्सिंग अथवा सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करून त्यांच्याकडून हा धोकादायक प्रवासाचा मार्ग निवडला जात आहे.
च्पोलिसांची नजर चुकवून शहराबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. १७ मेपर्यंत मार्केट बंद ठेवण्यात आले असल्याने मार्केटमध्येच वास्तव्य करणाऱ्यांना गावाकडेच धाव घेण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे.