पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून खारघर शहरातील ग्रामविकास भवनात कोरोना संशयित अथवा विदेशवारी करून आलेल्या नागरिकांसाठी १५0 खाटांचे विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात विदेशवारी करून आलेल्या नागरिकांना १४ दिवस या ठिकाणी निगराणीत ठेवले जाणार असल्याची माहिती या वेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पनवेलमधील नागरिक शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेचे पथक रात्री अडीचच्या सुमारास विमानतळावर दाखल झाले. या वेळी पथकाने एका बसच्या साहाय्याने १६ जणांना पनवेलमध्ये आणून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यापैकी ९ जण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. टेनिस क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी हे खेळाडू पनवेलमधून दुबईला गेले होते. उर्वरित ७ जण राज्यातील विविध भागांतील असल्याने त्यांना त्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहे.दरम्यान, पनवेल महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व शासकीय व साप्ताहिक सुट्ट्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी चारही प्रभाग अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत मॉल्स, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यलय, खासगी शाळा, महाविद्यालये, निमशासकीय संस्था, अंगणवाड्या, बालवाड्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाºयांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही याबाबत निश्चित ठिकाणांना भेट देण्याचे आदेश आयुक्त देशमुख यांनी दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या काही नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयातून पळ काढण्याचादेखील प्रयत्न केला. या वेळी अशा नागरिकांना पालिकेच्या पथकाने शोधून काढले आहे. त्यांना खारघर येथील ग्रामविकास भवनात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांत सुमारे ३0 ते ४0 जण दुबईवरून पनवेलमध्ये दाखल झाले आहेत. सर्वांवर पालिकेची नजर आहे. काही जण घरातच स्वतंत्र खोलीत पालिका अधिकाºयांच्या निगराणीत थांबले आहेत.ग्रामविकास भवनातून कर्मचारी गायबपरदेश वारी करून आलेल्या नागरिकांना सतर्कता म्हणून खारघर शहारातील ग्रामविकास भवन येथे तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला. मात्र ही बातमी ऐकताच येथील कर्मचाºयांनी ग्रामविकास भवनातून पळ काढला. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाला येथील प्रशासनाच्या मार्फत कोणत्याही प्रकारचे सहकार्य झाले नाही. संबंधित नागरिक कोरोना संशयित आहेत असा समज ग्रामविकास भवनातील कर्मचाºयांचा झाल्याने त्यांनी कर्तव्यात कसूर करत येथून पळ काढला. याबाबत आयुक्त गणेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. कर्तव्य बजावण्याच्या वेळेला अशा प्रकारे पळ काढणे ही शरमेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.इंडिया बुल्सच्या इमारतीमध्ये सामग्रीची कमतरतामोठ्या संख्येने विदेशातुन येणाºया नागरिकांना एकाच ठिकाणी विलगीकरण केंद्र उभारण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोन येथील इंडिया बुल्सच्या कोन गावा जवळील रेंटल हौसिंग स्कीममधील बिल्डिंग क्रमांक ३ व ४ याठिकाणी १८ माळ्याच्या इमारतीत १००० खोल्यामध्ये विलगीकरण केंद्र उभारण्याच्या सूचना पनवेलचे महापालिका आयुक्तांना केल्या होत्या. मात्र संबंधित क्षेत्र पालिका कक्षेबाहेर असल्याने तसेच त्याठिकाणी संसाधनाची कमतरता लक्षात घेता आयुक्तांनी त्याठिकाणी विलगीकरण केंद्र तयार करणे शक्य नसल्याचे सांगत खारघर शहरातील ग्रामविकास भवनाची निवड केली. यासंदर्भातील माहिती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयालाही कळवली आहे.
Coronavirus : खारघरच्या ग्रामविकास भवनात कोरोना विलगीकरण केंद्र, महापालिका आयुक्तांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 2:25 AM