CoronaVirus News: नेरुळ, कोपरखैरणेत कोरोनामुक्त वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 11:58 PM2020-10-09T23:58:04+5:302020-10-09T23:58:12+5:30

CoronaVirus Navi Mumbai News: दिघामध्ये नियंत्रण : बेलापूरमध्ये ५,०९४ रुग्ण झाले बरे, शहरवासीयांना दिलासा

CoronaVirus Corona free growth in Nerul, Koparkhairane | CoronaVirus News: नेरुळ, कोपरखैरणेत कोरोनामुक्त वाढले

CoronaVirus News: नेरुळ, कोपरखैरणेत कोरोनामुक्त वाढले

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ब्रेक द चेन मोहिमेस यश येऊ लागले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. नेरुळ विभागात सर्वाधिक ६,२६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, कोपरखैरणेत ५,४३९ व बेलापूरमध्ये आतापर्यंत ५,०९४ रुग्ण बरे झाले आहेत. दिघा परिसरात कोरोना नियंत्रणात आणण्यात यश येत असून, तेथे सद्यस्थितीमध्ये फक्त ६२ रुग्ण शिल्लक आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी नागरी आरोग्य केंद्र व विभाग कार्यालयनिहाय उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक विभागाचा प्रतिदिन आढावा घेतला जात आहे. आयुक्त अभिजीत बांगर स्वत: प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवत असल्यामुळे मनपाचे डॉक्टर्स, विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही गांभीर्याने काम करू लागले आहेत. गुरुवारपर्यंत शहरातील रुग्णसंख्या ३९,४२१ झाली होती, परंतु त्यामधील तब्बल ३४,९८० रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. नेरुळ विभागात सर्वाधिक ६,२६२ रुग्ण बरे झाले आहेत. बेलापूर व कोपरखैरणेमध्येही ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. प्रत्येक नोडमध्ये शिल्लक रुग्णांची संख्या ६०० पेक्षा कमी झाली आहे.

दिघा झोपडपट्टी परिसरामध्ये कोरोना नियंत्रणात सर्वाधिक यश आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमाण पहिल्यापासून नियंत्रणात ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त ६२ रुग्ण या परिसरात शिल्लक असून, सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल कौतुक होऊ लागले आहे. कोरोनामृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले असले, तरी गुरुवारपर्यंत तब्ब्ल ७९८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये ऐरोली व कोपरखैरणेमध्ये प्रत्येकी १२९ जणांचा समावेश आहे. नेरुळ, बेलापूर, तुर्भे, सानपाडा परिसरातही बळींचे शतक पूर्ण झाले आहे. दिघा व घणसोलीमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अनुक्रमे ९१.५४ व ९१.३७ झाले आहे. उर्वरित ठिकाणी हे प्रमाण ८८ ते ८९पर्यंत पोहोचले आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे.

निगेटिव्ह अहवाल वाढले
कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. महानगरपालिकेच्या वतीने अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. आतापर्यंत सव्वादोन लाख नागरिकांच्या चाचण्या करण्यात यश आले आहे. प्रतिदिन २ ते ३ हजार चाचण्या केल्या जात आहेत. एकूण चाचण्यांपैकी १७ ते १८ टक्के अहवालच पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. नवीन रुग्णांची संख्याही कमी होऊ लागल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे. मृत्युदरही साडेतीनवरून २ टक्क्यांवर आला आहे.

नवी मुंबईमधील कोरोनामुक्त व शिल्लक रुग्ण
विभाग कोरोनामुक्त शिल्लक कोरोनामुक्तीचे प्रमाण
नेरुळ ६२६२ ५९४ ८९.९३
ऐरोली ४७५५ ५९२ ८६.८३
बेलापूर ५०९४ ५२३ ८८.९६
वाशी ३८४३ ५२१ ८६.५०
तुर्भे-सानपाडा ४००३ ५१८ ८६.२७
कोपरखैरणे ५४३९ ४९६ ८९.६९
घणसोली ४५१३ ३३७ ९१.३७
दिघा १०७१ ६२ ९१.५४

Web Title: CoronaVirus Corona free growth in Nerul, Koparkhairane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.