नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील एक व्यापा-यास कोरोनाची लागण झाली आहे. व्यापारी घाटकोपरमधील रहिवासी असून त्याचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्यामुळे बाजार समितीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई व नवी मुंबईमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येथील गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पूर्वी प्रतिदिन पाच मार्केटमध्ये एक लाख नागरिकांचा वावर असायचा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही 30 हजार पेक्षा जास्त गर्दी होत होती. प्रशासनाने प्रयत्न करून ही गर्दी दहा हजारांपर्यंत आणली आहे.
आतापर्यंत बाजार समितीशी संबंधित कोणाला कोरोनाची लागण झाली नव्हती. परंतु बुधवारी मसाला मार्केटमधील एक व्यापा-यास कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपासून त्याची तब्येत बिघडल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान दोन ते तीन वेळा व्यापारी मार्केटमध्ये आल्याचे बोलले जात आहे. एपीएमसीमध्ये रुग्ण सापडल्याने येथील व्यापारी व कामगारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.