पनवेल : पनवेलमध्ये सोमवारी तीन कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत. विशेष म्हणजे तीनपैकी दोन रुग्णांमध्ये डॉक्टरांचा समावेश असल्याने पनवेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या दोन डॉक्टरांमध्ये खारघर मधील 54 वर्षीय डॉक्टरचा समावेश आहे. तर दुसरा डॉक्टर खांदा कॉलनीमधील अष्टविनायक हॉस्पिटलमधील डॉक्टर आहे. खांदा कॉलनीमधील डॉक्टरांच्या संपर्कात आलेला हॉस्पिटल मधील रुग्णाला देखील संसर्ग झाल्याने शहरात नव्याने तीन रुग्नांची नोंद करण्यात आली आहे.
खारघरमधील कोरोनाची लागण झालेले डॉक्टर शिवडी मुंबई याठिकाणी कार्यरत होते. ते वास्तव्यास खारघर ला आहेत. त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पालिकेने त्वरित कोरोना(कोविड-19) रुग्णालय कामोठे येथे दाखल केले आहे. पालिका क्षेत्रात तीन रुग्णांची भर पडल्याने पनवेलमधील रुग्णांची संख्या 43 झाली आहे.
दरम्यान, दोन दिवसापूर्वी खांदा कॉलनी मधील 82 वर्षीय जेष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. हे जेष्ठ नागरिक अष्टविनायक हॉस्पिटल मध्ये त्यांना जडलेल्या विविधी व्याधींवर उपचार घेत असताना अचानक त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या जेष्ठ नागरिकांवर पनवेलमधील कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर संपूर्ण हॉस्पिटल सील करण्यात आले होते. त्यांच्याच संपर्कात आल्याने येथील डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या कळंबोली मधील एका रुग्णाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. पालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या 37 असल्याने पनवेलच्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 43 झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात 5 नवीन रुग्णाची नोंद आज झाल्याने रायगड जिल्ह्यातील रुग्णाची संख्या 54 झाली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी विनाकारण घराबाहेर पडु नये असे अवाहन आयुक्त गणेश देशमुख व प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केले आहे.