CoronaVirus : उलवे नोडमध्ये डॉक्टरला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 06:58 PM2020-04-23T18:58:20+5:302020-04-23T18:59:01+5:30
CoronaVirus: नवी मुंबई मधील तेरणा हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन हेड म्हणून कार्यरत असल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली.
पनवेल : पनवेल ग्रामीणमधील उलवे नोडमध्ये एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी निष्पन्न झाले आहे. नवी मुंबई मधील तेरणा हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन हेड म्हणून कार्यरत असल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली.
उलवे सेक्टर 25 मध्ये राहत असलेल्या या डॉक्टरांच्या सोबत राहत असलेल्या त्यांच्या आई व पत्नीचे कोरोनाचा (कोविड 19) अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली. तसेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना 4 सहका-यांना होम क्वारंटाईन राहाण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे, या डॉक्टरांनी सोमवारी काही रुग्णांना तपासले असल्याने संबंधित रुग्णांनी आमच्याशी संपर्क साधावे असे आवाहन प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केले आहे.
ग्रामीण भागात नव्याने रुग्णांची नोंद झाल्याने पनवेल ग्रामीण ची संख्या 7 झाली आहे. तर पनवेल महानगर पालिका हद्दीत गुरुवारी नवीन रुग्ण सापडला नसल्याने पालिका हद्दीत रुग्णांची संख्या 40 आहे. यापैकी 14 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.ग्रामीण भागात 4 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.