Coronavirus: तुर्भेमधील कोरोना उपचार केंद्र पुन्हा झाले सुरू; जम्बो लसीकरण केंद्राचे वाशीत स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 01:26 AM2021-03-26T01:26:09+5:302021-03-26T01:26:24+5:30
एपीएमसीतील केंद्र सुरू करण्याच्या हालचाली
नवी मुंबई : कोरोना कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे महानगरपालिकेने बंद केलेले तुर्भेमधील राधास्वामी सत्संग आश्रमातील उपचार केंद्र पुन्हा सुरू केले आहे. एपीएमसीच्या निर्यात भवनमधील केंद्रही लवकरच सुरू केले जाणार असून जम्बो लसीकरण केंद्र वाशीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रावरील ताण वाढू लागला होता. भविष्यात रुग्ण अजून वाढण्याची शक्यता गृहीत धरून मनपाने बंद केलेली केंद्र पुन्हा सुरू करण्यास सुरुवात केली आहे. तुर्भेमधील राधास्वामी सत्संग आश्रमातील केंद्र पुन्हा सुरू केले असून तेथे १५२ रुग्ण उपचारांसाठी दाखल केले आहेत. बाजार समितीच्या निर्यात भवनमधील बंद केलेले उपचार केंद्रही लवकरच सुरू केले जाणार आहे.
महानगरपालिकेने निर्यात भवनमध्ये जम्बो लसीकरण केंद्र सुरू केले होते. तेथील लसीकरण केंद्र आता वाशी सेक्टर ५ मधील ईएसआयएस रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले आहे. तेथे सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण सुरू असणार आहे. नवीन उपचार केंद्रांसाठी डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी करार पद्धतीवर घेण्यास सुरुवात केली आहे.