नवी मुंबई : प्रशासन कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असतानाच, शहरातील विनापरवाना फेरीवाले त्यात बाधा ठरत आहेत. फेरीवाल्यांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने अनेक ठिकाणी कोरोनाबाधित किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून पालिकेने काही ठिकाणी भाजी विक्रेत्यांना व्यवसायासाठी मुभा दिली होती. याच संधीचा फायदा घेऊन कोणतीही खबरदारी न घेता व्यवसाय करणारे फेरीवाले प्रत्येक नोडमध्ये पाहायला मिळत आहेत. बहुतांश विक्रेते एपीएमसी मार्केटमधून मालाचीे खरेदी करून विक्री करणारे आहेत. अगोदरच मार्केटमधून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याने, त्यांच्याकडून स्वत:च्या, तसेच ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेशी खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे सेक्टर २ मधील एका भाजी विक्रेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या दरम्यान त्याच्या पत्नीला क्वारंटाईन करण्याची गरज असतानाही तसे न झाल्याने तिच्याकडून व्यवसाय सुरूच होता. अखेर पतीच्या निधनानंतर परिसरात चर्चा पसरल्यानंतर, त्यांच्याकडे भाजीखरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली होती.
असाच प्रकार कोपरखैरणे सेक्टर ७ व १५ येथे पाहायला मिळत आहे. एपीएमसी मार्केटशी संबंधित असलेल्या कुटुंबाकडून तिथल्या परिसरात भाजीपाला विक्रीसाठी मांडला जात आहे, परंतु त्यापैकी अनेकांच्या कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आहेत. अशाच प्रकारे सेक्टर ७ मधील एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती पॉझिटिव्ह असतानाही त्याच कुटुंबातील काही व्यक्तींनी व्यवसाय सुरू ठेवला. त्यामुळे संसर्ग पसरण्यास हातभार लागत आहे.सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळया विरोधात काहींनी आवाज उठवून संसर्ग टाळण्यासाठी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला, परंतु राजकीय वरदहस्त मिळवत, हे फेरीवाले सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचीही चाचणी करून ज्यांच्या कुटुंबात रुग्ण आढळला नसेल, अशांनाच व्यवसायाची मुभा देण्याची मागणी होत आहे. अन्यथा प्रशासनाच्या कोरोनाच्या विरोधातील मोहिमेचा फेरीवाल्यांकडून फज्जा उडण्याची शक्यता आहे.