नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा मिशन ‘ब्रेक द चेन’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजाणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचारीवर्गाला दिले आहेत. त्यासाठी ट्रेसिंग, टेस्ट आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत तसेच बेडस्ची संख्या वाढविण्यासाठी तात्पुरते बंद केलेली कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा वेग बऱ्याच अंशी जास्त आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजाचणी महापालिकेने सुरू केली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी आयुक्त बांगर यांनी सोमवारी एक बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी संबंधित विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यासाठी सर्व नागरी आरोग्य केंद्रांत कोरोना चाचणी केंद्र आणि फ्लू ओपीडी सुरू करण्यात येणार आहेत. तसेच ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या व वसाहतीत टेस्टिंग करण्यासाठी टेस्टिंग मोबाईल व्हॅन पुन्हा सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या कोरोना रुग्णांसाठी वाशी येथील सिडको एक्झिबिशनमधी उपचार केंद्रात १२०० बेडस् उपलब्ध आहेत परंतु रुग्णांची सध्याची वाढती संख्या लक्षात घेता आणखी ८०० ते १००० बेडस वाढविण्याची गरज आहे. त्यानुसार तात्पुरते बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत.
रविवारसह सातही दिवस लसीकरण महिलांसाठी राखीव दोन कोविड सेंटर सुरू करणे, कोरोनाबाधित गरोदर महिला व प्रसूती झालेल्या मातांसाठी बेलापूर येथील माता बाल रुग्णालयात बेडस्ची संख्या वाढविणे, नागरी आरोग्य केंद्रातील लसीकरणही ५ दिवसांऐवजी रविवारसह सातही दिवस उपलब्ध करणे, सध्याची कोविड प्रभावित स्थिती लक्षात घेता कोणतीही सुट्टी न घेता आठवड्यातील सात दिवस टेस्टिंग आणि लसीकरण सुरू ठेवणे आदी सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी केल्या आहेत.