Coronavirus: दाखल्यासाठी रुग्णालयाबाहेर परप्रांतीयांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 11:36 PM2020-05-03T23:36:10+5:302020-05-03T23:36:27+5:30
डॉक्टरांनी तपासणी शुल्क न वाढवण्याच्या सूचना
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : परराज्यातील व्यक्तींना मूळ गावी जाण्यासाठी आवश्यक असलेल्या परवान्याकरिता वैद्यकीय दाखल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी शहरातील बहुतांश दवाखान्यांबाहेर दाखल्यासाठी रांगा लागल्या होत्या. त्यांच्याकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याने अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
लॉकडाउनमुळे अडकलेल्या परराज्यातील व्यक्तींना त्यांच्या मूळ गावी पाठवले जाणार आहे, त्याकरिता पूर्वपरवानगी आवश्यक असून ती पोलिसांमार्फत दिली जाणार आहे. त्यानुसार रविवारी सकाळी नवी मुंबई पोलिसांकडून स्थानिक पोलीसठाण्यामार्फत अर्जाचे वाटप करण्यात आले. त्या अर्जासोबत संबंधितांना वैद्यकीय दाखला जोडण्यास सांगण्यात आला आहे. त्यानुसार अर्ज हाती लागताच अनेकांनी परिसरातील दवाखान्यांबाहेर गर्दी केली.
कोरोनामुळे दीड महिन्यांपूर्वीच काही डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. यामुळे प्रत्येक विभागात मोजकेच दवाखाने सुरू आहेत. त्या ठिकाणी स्वत:ची तपासणी करून घेऊन दाखला मिळवण्यासाठी परप्रांतीयांकडून गर्दी केली जात आहे. काही ठिकाणी अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. तर काही ठिकाणी कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता गर्दी केली जात आहे. असाच प्रकार रविवारी दुपारी घणसोली सेक्टर ४ परिसरात पाहायला मिळाला. परिसरात एकमेव दवाखाना असल्याने २००हून अधिकांनी दाखल्यासाठी गर्दी केली होती. अखेर पोलिसांना धाव घेऊन गर्दी नियंत्रणात आणावी लागली; परंतु पुढील दिवसांत ही गर्दी अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय दाखला महत्त्वाचा असल्याने काही डॉक्टरांकडून जादा शुल्क आकारून दाखला दिला जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे; परंतु काहीही करून दाखला मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना नाइलाजास्तव आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नागरिकांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन कोणीही तपासणीसाठी जादा शुल्क आकारू नये, अशा सूचना होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशनचे (हिम्पाम) नवी मुंबई अध्यक्ष डॉ. प्रतीक तांबे यांनी सांगितले.
पोलिसांची मध्यस्ती
घणसोली सेक्टर ४ परिसरात एकमेव दवाखाना असल्याने दोनशेहून अधिकांनी दाखल्यासाठी गर्दी केली होती. अखेर पोलिसांना धाव घेऊन गर्दी नियंत्रणात आणावी लागली; परंतु पुढील काही दिवसांत ही गर्दी अधिकच वाढणार असल्याने बंद असलेले दवाखाने प्राधान्याने सुरू करण्याची गरज भासणार आहे.