नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम व्यापारावर होऊ लागला असून आवक घटली आहे. शनिवारी भाजीपाला मार्केटमध्ये फक्त ४० वाहनेच आली आहेत.
मुंबई व नवी मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहवा, यासाठी शासनाने एपीएमसीमधील पाचही मार्केट सुरू ठेवली आहेत; परंतु मागील काही दिवसांपासून मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शुक्रवार १ मेपर्यंत पाच मार्केटमध्ये २६ रुग्ण आढळले आहेत. मार्केटमधील रुग्णांमुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना लागण झाली असून एपीएमसी मार्केटबाहेरील फळ विक्रेत्यालाही लागण झाली आहे. यामुळे व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजीपाला मार्केटमध्ये दोन दिवसांपासून आवक घटली आहे. शुक्रवारी ९५ ट्रक व टेंपोतून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. शनिवारी फक्त ४० वाहनांचीच आवक झाली आहे. सुरक्षेसाठी घरातच थांबा, असे आवाहन व्यापारी संघटनेने यापूर्वीच केले आहे. यामुळे अनेकांनी व्यवसाय बंद ठेवला आहे. फळ व धान्य मार्केटमध्ये आवक समाधानकारक होत आहे; परंतु मसाला व कांदा-बटाटा मार्केटमधील आवक घटली आहे. एपीएमसीमधील रुग्णांची संख्या वाढत राहिली तर आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे.