coronavirus: पास मिळण्यास विलंब, अतिरिक्त पैसे मोजूनही जीव धोक्यात; रबाळे, तुर्भे पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 03:36 AM2020-05-10T03:36:39+5:302020-05-10T03:36:54+5:30

शासनाने प्रवासाचा मार्ग मोकळा करूनही पास मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे त्यांच्याकडून या धोकादायक प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे.

coronavirus: delay in getting a pass, endangering life despite paying extra money; Rabale, Turbhe police action | coronavirus: पास मिळण्यास विलंब, अतिरिक्त पैसे मोजूनही जीव धोक्यात; रबाळे, तुर्भे पोलिसांची कारवाई

coronavirus: पास मिळण्यास विलंब, अतिरिक्त पैसे मोजूनही जीव धोक्यात; रबाळे, तुर्भे पोलिसांची कारवाई

Next

- सूर्यकांत वाघमारे 
नवी मुंबई : परप्रांतीयांकडून कोरोनाच्या भीतीने जादा पैसे मोजून जीव धोक्यात घातला जात आहे. लॉकडाउन लागल्यापासून त्यांची सुरू असलेली ही धडपड अद्यापही थांबलेली नसल्याचे दिसून येत आहे. तर शासनाने प्रवासाचा मार्ग मोकळा करूनही पास मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे त्यांच्याकडून या धोकादायक प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू आहे. तर राज्यासह नवी मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, लॉकडाउन अधिक वाढण्याची शक्यता आहे. गतआठवड्यात शासनाने परराज्यातील व्यक्तींना प्रवासाचा परवाना मिळवून राज्याबाहेर जाण्याची सवलत दिली, यामुळे ज्यांच्याकडे स्वत:ची वाहने आहेत व एकत्रित येऊन भाड्याचे वाहन ठरवले आहे, अशांनी तत्काळ गावचा रस्ता धरला; परंतु ज्यांच्याकडे वाहनांची सोय नाही, असे हजारो परप्रांतीय रेल्वेने गावी जाण्यासाठी प्रवासाच्या पुरवण्याचा अर्ज करून तो मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु एक आठवडा होऊनदेखील बहुतांश व्यक्तींना पास मिळालेला नाही. परिणामी, अशा परप्रांतीयांना गावी सोडण्याचे आमिष दाखवून ट्रक व टेम्पोमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकरिता एका व्यक्तीमागे किमान पाच हजार रुपये आकारले जात आहेत. त्यानुसार ट्रक व टेम्पोमध्ये २५ ते ३० व्यक्तींना कोंबून राज्याबाहेर नेले जात आहे. अशाच दोन ट्रकवर रबाळे एमआयडीसी व तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन्ही पोलीसठाण्यात वाहनचालक व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून वाहने जप्त करण्यात आली आहेत. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी शिळफाटा येथे नाकाबंदीत ट्रक अडवून ही कारवाई केली असता त्यामध्ये ३० प्रवासी आढळून आले. सर्व जण ऐरोली-चिंचपाडा येथील राहणारे आहेत. तर देवीधामनगर येथे ट्रकमध्ये प्रवासी भरले जात असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.

प्रतिव्यक्ती तीन ते पाच हजार भाडे

रबाळेत पोलिसांना ट्रकमध्ये १२ व्यक्ती आढळून आल्या. सर्व जण उत्तर प्रदेश व इतर ठिकाणी जाणार होते. त्याकरिता प्रतिव्यक्ती तीन ते पाच हजार रुपये भाडे ठरवण्यात आले.
कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना गावची ओढ लागली आहे. दोन राज्यांमधील प्रक्रियेमुळे त्यांचे पास मिळण्यास विलंब होत आहे. तर अनेकांना पास मिळेल की नाही, याची खात्री वाटत नसल्याने बेकायदेशीर मार्गाने गाव गाठण्याचा प्रयत्न होत आहे.

Web Title: coronavirus: delay in getting a pass, endangering life despite paying extra money; Rabale, Turbhe police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.