coronavirus: शहरात कोरोनाला रोखण्यात दिघा विभाग आघाडीवर, नवी मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:34 AM2020-10-30T00:34:03+5:302020-10-30T00:34:24+5:30
Navi Mumbai coronavirus: कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ अभियान राबविले असून, शून्य मृत्युदर करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून उपाययोजना सुरू आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या उपाययोजनांना यश येऊ लागले आहे. रुग्ण संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. कोरोनाला रोखण्यामध्ये दिघा विभाग आघाडीवर असून, २३० दिवस सातत्याने रुग्णसंख्या सर्वांत कमी ठेवण्यात यश आले आहे. नेरूळमध्ये सर्वांत जास्त रुग्ण मुक्त झाले असून, कोरोनामुक्त होण्याची टक्केवारी घणसोलीत सर्वांत जास्त आहे.
कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ अभियान राबविले असून, शून्य मृत्युदर करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून उपाययोजना सुरू आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. सद्य:स्थितीमध्ये शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. बुधवारी शहरातील एकूण रुग्णसंख्या ४४,०५० झाली होती. त्यापैकी ४१,१७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, १९८६ रुग्ण शिल्लक राहिले आहेत. सर्वांत कमी रुग्ण दिघा विभागामध्ये आहेत. मार्चपासून या परिसरात १,२१९ जणांना कोरोना झाला असून, त्यापैकी १,१६६ जण उपचार घेऊन घरी गेले आहेत. ४० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सद्य फक्त ५३ रुग्ण शिल्लक आहेत. १३ मार्चपासून या परिसरातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभागास यश आले आहे. झोपडपट्टी परिसरातील कामगिरी लक्षणीय आहे. नवी मुंबईमध्ये नेरूळ विभागातून सर्वाधिक ७,२८१ रुग्ण बरे झाले आहेत. नेरूळमध्ये ४१४ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९३.१० टक्के आहे. सर्वाधिक ४४६ रुग्ण बेलापूरमध्ये शिल्लक आहेत. शहरातील मृत्युदर २ टक्क्यांवर आणण्यात प्रशासनास यश आले आहे.
दिवाळीमध्ये विशेष काळजी घ्या
नवी मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात येत असला तरी दिवाळीच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. सण, उत्सवामुळे खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी होऊ लागली आहे. नियमांचे पालन न केल्यास पुन्हा रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्कच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले.
आयुक्त अभिजित बांगर यांनी जुलैमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर रुग्ण वाढले तरी चालतील पण एकही मृत्यू होणार नाही यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या असून, त्यानुसार उपाययोजना सुरू केल्या आहेत. परिणामी, नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याचे दिसून येत आहे.
घणसोलीमध्ये सर्वाधिक ९५.११ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तेथील ५,३९७ रुग्णांपैकी ५,१३३ रुग्ण बरे झाले असून, आता फक्त १६४ रुग्ण शिल्लक आहेत.