नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटमध्ये मंगळवारी विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली. सर्व गाळ्यांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. पाचही मार्केटमध्ये आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे.एपीएमसी बंदच्या दुसऱ्या दिवशी कांदा मार्केटमध्ये विशेष साफसफाई मोहीम राबविली. रस्ते, गाळे, कँटीन, लिलावगृह, सार्वजनिक प्रसाधनगृह यांची साफसफाई करण्यात आली. महापालिकेच्या व एपीएमसीच्या पथकाने सर्वत्र औषध फवारणी केली. मार्केट पूर्णपणे खाली करण्यात आले आहे.मार्केटचे आवक व जावक गेट बंद केले असून महत्त्वाचे काम वगळता कोणालाही प्रवेश दिला जात नाही.एपीएमसीतील पाचही मार्केटमध्ये आरोग्य शिबिर सुरू केले आहे. दिवसभरात जवळपास पाचशे जणांची तपासणी केली आहे. नियमित साफसफाई व औषध फवारणी सुरू राहणार असल्याची माहिती सचिव अनिल चव्हाण यांनी दिली.रस्त्यालगत विक्रीबाजार समिती बंद असली तरी मार्केटच्या बाहेर रस्त्यावर अनधिकृतपणे कांदा-बटाटा व इतर कृषी मालाची विक्री सुरू आहे. विक्री करणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
coronavirus: कांदा-बटाटा मार्केटचे निर्जंतुकीकरण, आरोग्य तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 1:08 AM