कळंबोली : कामोठे परिसरात कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असून अत्यावश्यक सेवा वगळता शहर बंद ठेवण्यात आले आहे.परदेशातून वा अन्य राज्यांतून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात असून संशयितांवर उपजिल्हा रुग्णालय तसेच इतर रुग्णालयांत वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तर काही संशयितांना मुंबईतील रुग्णालयांत हलविले जात आहे. या रुग्णांना शासकीय तसेच खासगी रुग्णवाहिकेतून घेऊन जाण्यास टाळाटाळ करण्याचा प्रकार पनवेल येथे घडला आहे.आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी शासकीय तसेच खासगी रुग्णवाहिकांकडून सेवा दिली जाते. महापालिका, उपजिल्हा रुग्णालय, इतर रुग्णालये, शासकीय, खासगी अशा शंभरपेक्षा जास्त रुग्णवाहिका पनवेल परिसरातील नागरिकांना सेवा देतात. परंतु सध्या कोरोनाच्या रुग्णांना सेवा देण्यास या रुग्णवाहिका चालकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.कोरोनाच्या संशयित रुग्णांना घेऊन जाण्यास सरळ नकार देत आहेत. लागण होईल, कोण जाणार, ड्रायव्हर नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. बाहेरील देशातून तसेच परराज्यातून आलेल्या नागरिकांना तपासणीसाठी मुंबई येथे जावे लागत असल्याने रुग्णवाहिका लागते. पनवेल येथील रुग्णाचे नातेवाईक शुक्रवारी सकाळपासूनच रुग्णवाहिका मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र चालकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे.१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचाही नकारकोरोनाबाबत रुग्णाची जबाबदारी १०८ या रुग्णवाहिकेकडूनही झटकली जात आहे. आरोग्य विभागाकडून आपत्कालीन सेवा देण्यास तत्पर असलेल्या रुग्णवाहिकेकडून कोरोना रुग्णास घेऊन जाण्यास नकार दिला जात आहे.
Coronavirus : पनवेलमध्ये रुग्णवाहिका पुरविण्यास टाळाटाळ, चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 3:28 AM