- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा एमआयडीसीला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. आयात-निर्यातीवर निर्बंध आल्याने लहान-मोठे कारखानदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसली आहे. यामुळे काही कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत. तर काही बंद करण्याच्या मार्गावर आहेत. कोट्यवधी उलाढाल असलेल्या एमआयडीसीत कोरोनामुळे कारखानदार हतबल झाला आहे. अशीच परिस्थिती जास्त काळ राहिली तर आर्थिक फटका अनेक कंपन्यांना बसेल, त्यामुळे अनेक कारखाने डबघाईला जातील, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.पनवेलपासून जवळच तळोजा एमआयडीसी ९०७ हेक्टरवर विस्तारित झाली आहे. या औद्योगिक वसाहतीत ९०० कारखाने आहेत. यापैकी ७५० लहान-मोठे कारखाने चालू आहेत, तर १५० कारखाने बंद अवस्थेत आहेत. या औद्योगिक वसाहतीत विशेष म्हणजे जवळपास ४०० कारखाने हे रासायनिक कारखाने आहेत. यात सुमारे ५० हजार कामगार काम करतात. सध्या कोरोना व्हायरसने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. यांचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही झाला आहे. प्रदूषणाबाबत चर्चेत असलेल्या औद्योगिक वसाहतीला आता कोरोनाचे ग्रहण लागले आहे, त्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीला कोट्यवधीचा फटका बसल्याचे कारखानदारांचे मत आहे. बाहेर देशातील मालाची आयात-निर्यात करण्यावर बंदी आल्याने काही कारखाने बंद आहेत, तर काही बंद करण्याच्या स्थितीत आहेत. तळोजा एमआयडीसीत बहुसंख्य लघु, मध्यम आणि मोठ्या इंडस्ट्रीजचे मॅन्युफॅक्चरिंग प्लाण्ट आणि कार्यालय आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बाहेर देशातील येणारा कच्चा माल आता येणे बंदझाले आहे. कारखान्यातील तयार झालेला मालही निर्यात करता येत नसल्याने कोट्यवधी रु पयांची उलाढाल ठप्प झाली आहे.ट्रक व मालवाहतूक ठप्प : कोरोना व्हायरसच्या भीतीने मालाची आयात व निर्यात बंद केल्याने अवजड वाहतूक तसेच ट्रक व्यवसाय ठप्प झाला आहे. भाडे न मिळाल्याने ट्रक, टेम्पो, कंटेनर, अवजड वाहने यांना ब्रेक लागला आहे. गाड्यांना भाडे मिळत नसल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. गाड्यांचे बँकेतील हप्ते कसे भरणार, अशी प्रतिक्रि या कळंबोली येथील ट्रक व्यावसायिक गोविंद साबळे यांनी दिली.कोरोना व्हायरसमुळे जगातील उद्योगावर परिणाम झाला आहे. त्यात आमच्या तळोजा कारखानदारांचा जीव मेटाकुटीला आला आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. आयात, निर्यातीवर निर्बंध आल्याने बरेच कारखाने, साठवणूक गोदाम बंद झाली आहेत, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कोरोना व्हायरसचा औद्योगिक वसाहतीतील उत्पादन, रोजगारावर परिणाम झाला आहे.- शेखर श्रींगारे, अध्यक्ष, तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनरोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळतळोजा औद्योगिक वसाहतीत लघु व मध्यम कारखान्यात रोजंदारीवर काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोना व्हायरस आल्याने या कारखानदारांनी काम करणाऱ्यांना सुट्टी दिली आहे; पण रोजंदारीवर काम करणाºयांना हजेरीविना पैसे मिळत नाहीत. त्यांच्यावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत बाहेरील राज्यातील कामगार काम करतात. त्याचबरोबर पनवेल ग्रामीण भागातील गावकºयांची उपजीविका याच औद्योगिक वसाहतीवर अवलंबून आहे.
Coronavirus : तळोजातील उलाढालीलाही ग्रहण, कारखानदारांना आर्थिक झळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 3:40 AM