नवी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला, मृत्युदरही नियंत्रणात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 02:56 AM2020-12-12T02:56:59+5:302020-12-12T02:57:42+5:30
Coronavirus : दिवाळीनंतर नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. दुसरी लाट सुरू झाल्यामुळे शहरवासीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यात आरोग्य विभागास यश येऊ लागले आहे. शहरातील शिल्लक रुग्णांची संख्या १६०५ वरून १३३४ झाली आहे. मृत्युदरही नियंत्रणात आला असून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण २६३ दिवसांवरून ३५७ दिवसांवर गेले आहे.
दिवाळीनंतर नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. दुसरी लाट सुरू झाल्यामुळे शहरवासीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे व नागरिकांमध्ये जनजागृती केल्यामुळे दुसरी लाट थाेपविण्यात यश येऊ लागले आहे.
नोव्हेंबरमध्ये ७२,७७१ चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ३७३० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. पॉझिटिव्हिटी रेट ५.१२ टक्के एवढा होता. १ ते १० डिसेंबर दरम्यान ३१,६४५ चाचण्या करण्यात आल्या असून ११३६ रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्हीटी रेट ३.५८ झाला आहे. मृत्यूचे दर २.२ टक्क्यांवर नियंत्रित करण्यात यश आले आहे. नोव्हेंबरमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी घसरून २६३ दिवसांवर आला होता. सद्य:स्थितीमध्ये हा कालावधी ३५७ दिवसांवर आला आहे. सद्य:स्थितीमध्ये फक्त ३.३२ टक्के रुग्णच शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे. मास्क, सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर, सतत हात धुणे व सामाजिक अंतर या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
- अभिजीत बांगर,
आयुक्त, महानगरपालिका