नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घणसोली येथील एका नागरिकाने इलेक्ट्रिक हॅण्ड सॅनिटायझर मशीन बनविले आहे. या मशीनच्या माध्यमातून हात स्वच्छ करण्यासाठी केमिकल किंवा पाण्याचा वापर होत नसून मशीनची अधिकृत लॅबमध्ये तपासणी करण्याची मागणी या नागरिकाने शासनाकडे केली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी अद्याप लस तयार झाली नसून संसर्ग टाळण्यासाठी प्राथमिक उपाययोजनांची आवश्यकता आहे. यात हातांची स्वच्छता, मास्क वापरणे, डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळणे, स्वच्छता राखणे आदी करणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील घणसोली विभागातील संभाजी कदम यांनी इलेक्ट्रिक हॅण्ड सॅनिटायझर मशीनची निर्मिती केली आहे. कदम यांचे शिक्षण इलेक्ट्रॉनिक इंजिनीयरिंगपर्यंत झाले असून मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केमिकल आणि पाण्याचा कोणताही वापर न करता हात स्वच्छ करण्याचे इलेक्ट्रिक यंत्र त्यांनी बनविले आहे. या मशीनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून या यंत्राच्या वापराने तीस सेकंदात हातावर असलेले विषाणू मरण पावतात आणि हातांची स्वच्छता होत असल्याचा दावा कदम यांनी केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने हाताच्या स्वच्छतेसाठी हे यंत्र कितपत फायदेशीर आहे याची लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी. यासाठी कदम यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे मार्च महिन्यापासून ईमेलच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला. हे यंत्र बनविण्याची कल्पना आणि पेटंट शासनाकडे पाठविला. शासनाचा आरोग्य विभाग, एनआयव्ही, आयसीएमआर या संस्थांना ईमेल केले. परंतु शासनाच्या माध्यमातून अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत कदम यांनी व्यक्त केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या यंत्राचा वापर होणार असून शासनाने यंत्राची लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.