coronavirus: राज्य शासनाकडून महापालिकांना मदत नाही , फडणवीस यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 01:44 AM2020-07-05T01:44:48+5:302020-07-05T01:45:44+5:30
पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णालय प्रशासनाशी फडणवीस यांनी चर्चा केली. पनवेल महानगरपालिका आयुक्तांशीही त्यांनी संवाद साधला. फडणवीस यांनी राज्य शासनावर टीका करीत राज्य शासनामार्फत महानगरपालिकांना कोणत्याही प्रकारची मदत केली जात नसल्याचा आरोप केला.
पनवेल : राज्य शासनाकडून कोविडबाबत महानगरपालिकांना एक पैशाचीही मदत करण्यात आलेली नाही. कोविडबाबत लढा देण्यासाठी आरोग्यव्यवस्था पालिकेकडे उपलब्ध नाहीत. ही व्यवस्था राज्य शासनाकडे असल्याने, त्याबाबत राज्य शासनाने वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले. पनवेलमधील वाढत्या रुग्णांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस पनवेलमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णालय प्रशासनाशी फडणवीस यांनी चर्चा केली. पनवेल महानगरपालिका आयुक्तांशीही त्यांनी संवाद साधला. फडणवीस यांनी राज्य शासनावर टीका करीत राज्य शासनामार्फत महानगरपालिकांना कोणत्याही प्रकारची मदत केली जात नसल्याचा आरोप केला. पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात दहा व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे. एमएमआर रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे लागेल, असे सांगितले.
यावेळी पनवेल महानगरपालिका मुख्यालयात सुधाकर देशमुख व प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्याशी संवाद साधत, प्रशासन राबवीत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, महापौर डॉ. कविता चौतमोल आदी उपस्थित होते.
फडणवीसांच्या मागे कार्यकर्त्यांची फौज
पालिका मुख्यालयात आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी जात असताना, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज फडणवीस यांच्यामागे असल्याचे दिसून आले. यावेळी पालिका मुख्यालयातच सोशल डिस्टन्सिंगचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून फज्जा उडाला.