Coronavirus : मुलीच्या अखेरच्या दर्शनालाही मुकला पिता; लॉकडाऊनमुळे सर्वच मार्ग बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 04:58 PM2020-04-11T16:58:14+5:302020-04-11T17:01:26+5:30
मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदा ते अलाहाबाद (उत्तर प्रदेश) जाणार असतानाच लॉकडाऊनमुळे ते वाशीतच अडकले होते. अशातच त्यांच्यापर्यंत मुलीच्या निधनाची बातमी पोहोचली.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कोरोनानं लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे एक पिता आपल्या तीन महिन्यांच्या मुलीचे अखेरचेदेखील दर्शन घेऊ शकलेला नाही. वाशीतील अब्दुल जिलानी यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे. मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदा ते अलाहाबाद (उत्तर प्रदेश) जाणार असतानाच लॉकडाऊनमुळे ते वाशीतच अडकले होते. अशातच त्यांच्यापर्यंत मुलीच्या निधनाची बातमी पोहोचली.
वाशी येथे खासगी नोकरी करणारे अब्दुल जिलानी हे मूळचेअलाहाबादचे (उत्तर प्रदेश)राहणारे असून, तीन महिन्यांपूर्वी त्यांना कन्यारत्न झाले होते. पत्नी पाच महिन्यांची गरोदर असताना ते प्रसूतीसाठी पत्नीला गावी सोडून आले होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना मुलगी झाल्यानंतर ते मार्च महिन्याच्या अखेरीस पत्नी व नवजात मुलीच्या भेटीला जाणार होते. तत्पूर्वीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन झाल्याने ते नवी मुंबईतच अडकून पडले. यानंतरही लॉकडाऊन उठल्यानंतर गावी येतो, असे त्यांनी कुटुंबीयांना कळवले होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीची प्रकृती बिघडल्याचा निरोप गावावरून आला. परंतु लॉकडाऊनमुळे अब्दुल यांचा नाईलाज झाला होता. त्यातही ते मुलीची प्रकृती लवकरच ठीक होईल व लवकरच आपण गावी जाऊ अशा आशेवर होते. परंतु चार दिवसांपूर्वी त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच त्यांना जबर धक्का बसला. यावेळी मुलीच्या अंतिम दर्शनासाठी गावी जाण्याचे प्रयत्न देखील त्यांनी केले. परंतु काही ठिकाणावरून त्यांची मागणी फेटाळण्यात आली. तर काही ठिकाणी परवानगी मिळून देखील गावापर्यंत पोहोचण्याचे सर्व मार्गच बंद असल्याने त्यांना मुलीचे अंतिम दर्शन देखील घेता आले नाही. अखेर इलाहाबाद येथे पित्याच्या पश्च्यात चिमुकलीचा अंत्यविधी उरकण्यात आला. तर अनपेक्षित पणे त्यांच्यावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.