Coronavirus: कमाल आहे राव! वॉकिंगसाठी भरला आगाऊ पाच हजारांचा दंड; सिडकोच्या अभियंत्याचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 10:29 AM2021-05-20T10:29:03+5:302021-05-20T10:29:16+5:30
शासकीय अधिकाऱ्यांकडूनच नियमांची पायमल्ली
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कठोर निर्बंधामुळे वॉकिंगला बंदी असतानाही सिडकोच्या एका अभियंत्याकडून नियमित नियमाची पायमल्ली करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यांच्यावर तीन वेळा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु आपण वॉकिंग थांबवणार नसल्याचे सांगत त्यांनी आगाऊ पाच हजार रुपयांचा दंड पालिकेला भरला.
यावरून शासकीय अधिकारीच नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू असून, या कालावधीत मॉर्निंग वॉक करण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच मॉर्निंग वॉकच्या ठिकाणांवर पालिकेच्या पथकांमार्फत पाळत ठेवून, नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार चार महिन्यांत एक हजाराहून अधिक व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. परंतु काही शासकीय अधिकारीच बेधडकपणे नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार मागील काही दिवसांपासून पालिकेच्या भरारी पथकासोबत एनआरआय कॉम्प्लेक्स लगतच्या मार्गावर घडत आहे.
त्या ठिकाणी वॉकिंगला येणाऱ्यांवर कारवाईच्या उद्देशाने पालिकेचे पथक नेमण्यात आले आहे. या पथकाकडून सिडकोचे अभियंता राजीव सिंग यांच्यावर अद्यापपर्यंत तीन वेळा कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक वेळी त्यांच्याकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मंगळवारीही ते भरारी पथकाला विनामास्क वॉकिंग करताना आढळले असता सिंग यांनी थेट पाच हजार रुपयांचा आगाऊ दंड भरला. प्रत्येक वेळी आपण दंड भरायला तयार आहोत; परंतु वॉकिंग थांबवणार नाही, असे त्यांनी पथकाला सांगितले. त्यांच्या या असहकार्य भूमिकेबाबत पालिकेच्या पथकाने आयुक्तांना कल्पना देऊन समज देण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर पुन्हा वॉकिंग करताना आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊन त्यांना सोडून देण्यात आले. कारवाईत पालिकेचा पक्षपातीपणा?विनाकारण घराबाहेर फिरताना आढळणाऱ्या सर्वसामान्यांवर थेट गुन्हे दाखल होत आहेत. मात्र सिडको अभियंत्यांकडून तीनदा नियमांचे उल्लंघन होऊनदेखील केवळ दंड आकारून सोडून देण्यात आले. यावरून कारवाईतला पक्षपातीपणा दिसून येत असल्याने सिडको अभियंत्यांवरदेखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
सिडको अभियंते राजीव सिंग यांच्यावर दंडात्मक कारवाई करूनदेखील ते पुन्हा वॉकिंगला येत होते. यादरम्यान त्यांनी पाच हजार रुपये आगाऊ दंड भरून वॉकिंग सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. यामुळे मंगळवारी त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन समज देण्यात आली आहे.- शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी - बेलापूर