CoronaVirus: खाकी वर्दीत दिसला माणुसकीचा झरा; स्थलांतरितांनाही आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 01:14 AM2020-04-24T01:14:06+5:302020-04-24T01:14:48+5:30
पाच हजारांहून अधिक गरजूंना अन्नधान्य वाटप
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : लॉकडाउनमुळे रोजगार बुडाल्याने अनेक मजूर, कामगार, घरोघरी जाऊन विक्री करणारे फेरीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा व्यक्तींच्या मदतीसाठी महापालिका, सामाजिक संस्थांबरोबरच पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. महिनाभरात पाच हजारांहून अधिक व्यक्तींना अन्नधान्य वाटप करून खाकी वर्दीनेही माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
कोणीही उपाशी राहू नये म्हणून स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. नवी मुंबई पोलीसही एकीकडे कायदा व सुव्यवस्था सांभाळत दुसरीकडे माणुसकीचे दर्शन घडवत आहेत. लॉकडाउनमुळे निराधार व झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यापर्यंत अन्नधान्याची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. रेल्वे स्थानकांच्या आवारातील भिकारी, दुर्लक्षित झोपडपट्ट्या, निराधार व्यक्ती, मजूर कामगार यांना त्यांच्याकडून अन्नधान्याची मदत दिली जात आहे.
दुर्गम भागातील गरजू व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. तर ठप्प झालेल्या बांधकामांच्या ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांनाही अन्नधान्याची मदत केली जात आहे. त्याशिवाय अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांनाही भेट देऊन आवश्यक साहित्यांचा पुरवठा केला जात आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत स्थानिक पातळीवर हे कार्य सुरू आहे. त्यानुसार महिनाभरात पाच हजारांहून अधिक व्यक्तींपर्यंत पोलीस पोहोचले असून त्यांची दोन वेळची भूक भागवली जात आहे. यासाठी काही सामाजिक संस्था व खासगी व्यक्तींचाही हातभार लागत आहे.
पोलिसांमार्फत काही ठिकाणी कम्युनिटी किचन चालवले जात आहेत. त्या ठिकाणी शिजवलेले अन्न दोन्ही परिमंडळमधील निराधार व्यक्तींपर्यंत पोहोचवले जात आहे. यामुळे कोरोनाच्या भीतीने शहर सोडून निघालेल्यांना आधार मिळाला आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासह दोन्ही परिमंडळचे उपायुक्त, विशेष शाखा व मुख्यालयाचे उपायुक्त, वाहतूक शाखेचे उपायुक्त विशेष प्रयत्न करत आहेत. शहरातून कोणीही बाहेर जाऊ नये अथवा बाहेरच्या व्यक्ती शहरात येऊ नयेत याचीही चोख भूमिका पोलीस बजावत आहेत. त्याकरिता शहाराच्या प्रत्येक प्रवेशमार्गावर दिवसरात्र गस्त घातली जात आहे. त्या ठिकाणी मालवाहतूक करणाºया वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली जात आहे. तर ज्यांच्या वास्तव्याचे ठिकाण नाही अशांची वाशी, कळंबोली अथवा पनवेलमधील शेल्टर होममध्ये रवानगी केली जात आहे. तर निराधार व्यक्तींनाही स्थानिक शेल्टर होममध्ये भरती करून त्यांच्याही अन्नपाण्याची सोय करून दिली जात आहे.
जेवणाची सोय
शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रमुख जबाबदारी पोलिसांवर आहे. ही भूमिका बजावत गरजू व्यक्तींच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यातदेखील नवी मुंबई पोलीस गुंतले आहेत. खाकी वर्दीतील माणुसकीच्या दर्शनामुळे सर्वत्र कौतुकही होत आहे.