Coronavirus :APMCमधील कांदा-भाजीसह फळ मार्केट 11 एप्रिलपासून बंद राहणार; बाजार समिती प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 06:47 PM2020-04-09T18:47:13+5:302020-04-09T19:03:19+5:30
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी धान्य मार्केट सुरूच राहणार आहे.
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा, बटाटा, भाजीसह फळ मार्केट 11 एप्रिलपासून बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईमध्ये भाजीपाल्याची थेट विक्री करणा-यांना मात्र परवानगी असणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी धान्य मार्केट सुरूच राहणार आहे.
बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील एक व्यापा-यास कोरोनाची लागण झाल्यामुळे माथाडी कामगारांसह व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना झालेला व्यापारी घाटकोपरमधील रहिवासी असून तो अनेक दिवसांपासून मार्केटमध्ये आला नसला तरी नागरिकांमधील भीती कायम आहे. घाऊक व्यापारी भाजीपाला महासंघ, फळ बाजार आवारातील फ्रंट ऑफ युनायटेड फ्रुट्स असोसिएशन, कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ या व्यापारी संघटनांनी मार्केट बंद ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनीही कामगारांनी कामावर येऊ नये, असे आवाहन केले होते. यामुळे बाजार समिती प्रशासनाने गुरुवारी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये कांदा-बटाटा, भाजीपाला व फळ मार्केट 11 एप्रिलपासून पुढील आदेश येईर्पयत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समिती सचिव अनिल चव्हाण यांनी याविषयी परिपत्रक काढून ते तीनही मार्केटमधील व्यापारी संघटनांना दिले आहे.
भाजीपाला व फळ मार्केट बंद राहणार असले तरी शेतकरी ते ग्राहक ही योजना सुरूच राहणार आहे. या योजनेअंतर्गत सद्य:स्थितीमध्ये प्रतिदिन 250 ते 300 टेम्पोंमधून भाजीपाला मुंबईत पाठविण्यात येत आहे. यापुढेही तो पाठविण्यात येणार आहे. फळे व कांदा-बटाटाही थेट पाठविण्यात येणार आहे. नागरिकांना गहू, ज्वारी, डाळी, कडधान्ये या वस्तू उपलब्ध व्हाव्या यासाठी धान्य मार्केटमधील व्यवहार सुरू राहणार आहे.
-------------------------------
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजीपाला, फळ व कांदा मार्केट बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. या मागणीचा विचार करून तीनही मार्केट 11 एप्रिलपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजीपाला थेट मुंबईत पाठविण्याची योजना सुरू राहणार असून धान्य मार्केटही सुरू ठेवले जाणार आहे.
- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई बाजार समिती
--------------------------------
बाजार समितीमध्ये गुरुवारी मार्केटनिहाय झालेली आवक
मार्केट आवक (वाहने)
भाजीपाला मार्केट 134
मुंबईत थेट भाजीपाला विक्री 317
कांदा-बटाटा 8
फळ मार्केट 305
मसाला मार्केट 36
धान्य मार्केट 260