Coronavirus : फळे-भाजीपाला मार्केट दोन दिवस बंद, आठवड्यातून दोनदा निर्जंतुकीकरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 03:00 AM2020-03-17T03:00:46+5:302020-03-17T03:01:18+5:30

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५० ते ६० टन कचरा निर्माण होत असतो.

Coronavirus: The fruit-vegetable market will be Close for two day, There will be disinfection twice a week | Coronavirus : फळे-भाजीपाला मार्केट दोन दिवस बंद, आठवड्यातून दोनदा निर्जंतुकीकरण होणार

Coronavirus : फळे-भाजीपाला मार्केट दोन दिवस बंद, आठवड्यातून दोनदा निर्जंतुकीकरण होणार

googlenewsNext

नवी मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजी व फळ मार्केट गुरुवार व रविवारी पूर्णपणे बंद करून मार्केटची स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. कोरोनासंदर्भात आरोग्यविषयक मदतीसाठी हेल्पलाइन नंबरही सुरू केला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५० ते ६० टन कचरा निर्माण होत असतो. यामधील जवळपास ८० टक्के कचरा भाजी व फळ मार्केटमध्ये तयार होत असतो. येथील पाच मार्केटमध्ये व्यापारी, माथाडी, वाहतूकदार व इतर मिळून जवळपास १ लाख नागरिक काम करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मार्केटमध्ये होऊ नये यासाठी बाजार समितीने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. ३१ मार्चपर्यंत भाजीपाला व फळ मार्केट प्रत्येक गुरुवारी व रविवारी बंद ठेवले जाणार आहे. दोन दिवसांमध्ये मार्केटमध्ये विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे. मार्केटमधील सर्व पॅसेज धुऊन घेतले जाणार आहेत. कीटकनाशक फवारणी करून संपूर्ण मार्केटचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व व्यापारी संघटनांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. मार्केटमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. स्वच्छता ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
भाजी व फळांव्यतिरिक्त कांदा, धान्य व मसाला मार्केटमधील स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. या तीन मार्केटमध्ये ओला कचरा जास्त नसतो. मार्केटमध्ये कुठेही कचरा साचणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेविषयी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. बाजार समितीमधील प्रत्येक घटकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मार्केटमध्ये कोरोनाविषयी माहितीसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. कोरोनाविषयी कोणतीही माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनाला देण्यात यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कांदा मार्केटमध्ये स्वच्छता अभियान
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शनिवारी व रविवारी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संपूर्ण मार्केट, रस्ते धुतले. प्रसाधानगृहांचीही स्वच्छता करण्यात आली. कांदा मार्केट ३१ मार्चपर्यंत दोन तास लवकर बंद केले जाणार असून नियमित स्वच्छता केली जाणार आहे.

मुुंबई बाजार समितीच्या पाचही मार्केटमधील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. भाजी व फळ मार्केट गुरुवारी व रविवारी पूर्णपणे बंद करून तेथे विशेष स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे.
- अनिल चव्हाण,
सचिव, मुंबई बाजार समिती

कांदा-बाटाटा मार्केट पाण्याने पूर्णपणे धुऊन घेण्यात आले आहे. शनिवार व रविवार दोन दिवस विशेष मोहीम आयोजित केली होती. व्यापाºयांमध्ये जनजागृती सुरू केली आहे.
- अशोक वाळुंज,
संचालक,
कांदा मार्केट

मार्केटमध्ये नियमित स्वच्छता राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. व्यापाºयांनी व ग्राहकांनी जास्तीत जास्त फोनवरून मालाची आॅर्डर घेऊन मार्केटमधील गर्दी कमी करावी, असे आवाहन केले आहे. आठवड्यातून दोन दिवस स्वच्छतेसाठी मार्केट बंद ठेवले जाणार आहे.
- संजय पानसरे, संचालक फळ मार्केट

उपाययोजना पुढीलप्रमाणे
बाजार आवारातील महत्त्वाचे घटक असणारे आवक-जावक गेटवरील कर्मचारी, सुरक्षारक्षक, माथाडी, मापाडी कामगार यांना उपाययोजनांबाबत माहिती देण्यात येत आहे.
व्यापारी, अडते यांनाही त्यांच्या कर्मचाºयांना मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
ग्राहकांची गर्दी कमी करण्यासाठी फोन व आॅनलाइन आॅर्डर घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Coronavirus: The fruit-vegetable market will be Close for two day, There will be disinfection twice a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.