CoronaVirus: बंदोबस्तावरील पोलिसांना सतावतोय आरोग्याचा प्रश्न; नवी मुंबईतील पोलिसांची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 11:07 PM2021-04-24T23:07:07+5:302021-04-24T23:07:11+5:30
नवी मुंबईतील पोलिसांची स्थिती : कुटुंबाचीही वाटते आहे चिंता
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनामुळे लॉकडाऊनची वेळ आल्याने पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण वाढला आहे. यादरम्यान दिवस-रात्र पहारा द्यावा लागत असल्याने त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे. दरम्यान, ५७ टक्के पोलिसांचा दुसरा डोस पूर्ण झालेला असला तरीही कुटुंबाच्या चिंतेनेही अनेकांच्या जिवाची धाकधूक होत आहे.
राज्य सरकारच्या व स्थानिक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नवी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा बंदोबस्तासाठी कंबर कसली आहे. अत्यावश्यक सेवावगळता इतर कोणत्याही ठोस कारणाशिवाय नागरिकांना घराबाहेर फिरण्यास मनाई आहे. यानंतरही अनेकजण या ना त्या कारणाने रस्त्यांवर गर्दी करत आहेत. अशा विनाकारण भटक्यांना आवर घालण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दिवस-रात्र जागोजागी नाकाबंदी लावण्यात आली आहे.
यामुळे नियमितच्या कामांसह बंदोबस्ताचा ताण पोलिसांवर पडत आहे. तसेच रखरखत्या उन्हात कर्तव्य बजावत असल्याने त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच कर्तव्य बजावणाऱ्या वडिलांच्या सुरक्षेवरून पोलीसपुत्रांनाही त्यांची काळजी सतावत आहे. परंतु नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्याचा धाक निर्माण करून वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना झटावे लागत आहे.