Coronavirus: संकटात सरसावले मदतीचे हात; अनेकांनी धाडसाने कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:32 AM2020-07-02T04:32:53+5:302020-07-02T04:33:15+5:30
35,000 जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. 3,600 हुन अधिक जण बरे होऊन घरी परतले आहेत.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदतीसाठी हात पुढे करून नवी मुंबईकरांनी आदर्श निर्माण केला आहे. तर कोविड योद्ध्यांनीही बाधितांना धीर देऊन कोरोनावर मात करण्याचे बळ दिले. त्यामुळे अनेकांनी धाडसाने कोरोनावर मात केलेली आहे.
२३ मार्चला लॉकडाऊन घोषित करण्यात आला. दुसऱ्याच दिवसापासून शहरातील वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य झाले.
यादरम्यान एकट्या राहणाºया व्यक्तींसह चाकरमानी, झोपड्यांतील कुटुंबे अशा असंख्य व्यक्तींपुढे पोटाची खळगी भरवण्यासह इतरही गरजा निर्माण झाल्या होत्या. अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पाहता पाहता शेकडो नागरिकांनी व सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी घराबाहेर पाऊल टाकले. आलेल्या संकटावर मात करत त्यांच्याकडून गरजूंपर्यंत मदत पोचवली जात होती. त्यामध्ये अन्न धान्यासह कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. त्याशिवाय रुग्णवाहिका व इतर वैद्यकीय मदत पुरवण्याचेही काम अनेकांनी केले. त्यात पोलीस व पालिकाही आग्रही होती. पालिकेकडून नियमाने दररोज सुमारे ३५ हजार जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. त्याकामी अनेक ठिकाणच्या गुरुद्वार व तिथल्या यंत्रणा उपयुक्त ठरली. तर काही संघटनांची मनुष्याप्रमाणेच प्राण्यांना जीवदान देण्याचे काम या लॉकडाऊनच्या कालावधीत प्रामाणिकपणे केले. लोकप्रनिधींनी, वैद्यकीय संघटनांनी देखील आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या प्रभागात वाटून नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्याचा प्रयत्न केला. तर एपीएमसी मधील काही व्यापाऱ्यांनी पालिकेला उपयुक्त साहित्य पुरवून गरजूंना सुरु असलेल्या मदतीत खंड पडू दिला नाही.
लॉकडाऊन दरम्यान कुठेही नियमांचे उल्लंघन अथवा इतर अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त होता. एकीकडे कर्तव्य बजावत असतानाच दुसरीकडे गरजूंना मदतीचा हात दिला जात होता. रस्त्यावरील भिकारी, झोपडपट्या याठिकाणी तयार अन्न वाटताना खाकीतली माणुसकी दिसत होती. तर पालिकेचे सफाई कामगार, अग्निशमन दल व वैद्यकीय पथक हे खºया अर्थाने कोविड योद्धा बनले होते. कोरोनाबाबत गैरसमज असल्याने नागरिक भयभीत होत होते. अशावेळी दाखल रुग्णांना उपचारास धीर देण्याचे काम वैद्यकीय पथक करत होते. त्यामुळे उपचार घेऊन ३ हजार ६०० हून अधिक जण बरे झाले आहेत.
35,000 जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. 3,600 हुन अधिक जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर घणसोलीतील कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलेची यशस्वी प्रसूती झाली. 1,300 पैकी ११०० हून अधिक वृद्धांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे.