coronavirus:रुग्णालयांचे क्रमांक डॅशबाेर्डवर द्यावेत, शहरातील नागरिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 03:32 AM2021-04-03T03:32:07+5:302021-04-03T03:33:05+5:30

coronavirus in Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची संख्या देऊन त्याचा नागरिकांना काहीही लाभ होत नाही. रुग्णालयांचे संपर्क नंबर देणे आवश्यक आहे.

coronavirus: Hospital numbers should be given on dashboard, demand of city citizens | coronavirus:रुग्णालयांचे क्रमांक डॅशबाेर्डवर द्यावेत, शहरातील नागरिकांची मागणी

coronavirus:रुग्णालयांचे क्रमांक डॅशबाेर्डवर द्यावेत, शहरातील नागरिकांची मागणी

Next

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची संख्या देऊन त्याचा नागरिकांना काहीही लाभ होत नाही. रुग्णालयांचे संपर्क नंबर देणे आवश्यक आहे. याशिवाय किती रुग्णांवर घरामध्येच उपचार सुरू आहेत याचा तपशील देणेही आवश्यक आहे. 
सद्य:स्थितीमध्ये शहरात बेड्सची संख्या ३७४४ असून, रुग्णसंख्या सात हजारांपेक्षा जास्त आहे. २६८४ रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, उर्वरित रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत की ते मनपाच्या संपर्काच्या बाहेर आहेत हे स्पष्ट होत नाही.              नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व रुग्णालयांमधील बेड्सची संख्या नागरिकांना माहिती असावी यासाठी संकेतस्थळावर डॅशबाेर्डची निर्मिती केली आहे. या बोर्डवर शहरातील एकूण बेड, उपचार घेणारे रुग्ण व शिल्लक बेड यांचा तपशील देण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक रुग्णालयनिहाय तपशीलही दिला आहे. ही माहिती नियमित अद्ययावत करणे आवश्यक आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी याविषयी वारंवार सर्व रुग्णालयांना व मनपा अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत. यानंतरही माहिती अद्ययावत केली जात नव्हती. 
‘लोकमत’ने याविषयी शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तात्काळ माहिती अद्ययावत केली आहे; परंतु अद्याप रुग्णालयांचे व मनपाचे संपर्क नंबर देण्यात आलेले नाहीत. डॅशबोर्डवर सर्व रुग्णालयांचे नंबर देणे आवश्यक आहे. संपर्क नंबर असेल तर रुग्णांना बेडविषयी खात्री करून तेथे उपचारासाठी जाणे शक्य होणार आहे.
संपर्क नंबर नसल्यामुळे अनेक रुग्ण डॅशबोर्डची माहिती घेऊन रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत; परंतु रुग्णालयात गेल्यानंतर तेथे जागा शिल्लक नसल्याचे लक्षात येते. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर्स, आयसीयूची आवश्यकता असते; परंतु संपर्क नंबर नसल्यामुळे संबंधित रुग्णालयाशी समन्वय साधता येत नाही. 
परिणामी राजकीय व्यक्ती व समाजसेवकांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे आयुक्तांनी लवकरात लवकर संपर्क नंबर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली जात आहे. घरांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहितीही डॅशबोर्डवर किंवा मनपाच्या नियमित अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.  

‘लोकमत’च्या बातमीची दखल
 महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर अपूर्ण माहिती देण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांचा गाेंधळ होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल घेऊन मनपाने सर्व माहिती तात्काळ अद्ययावत केली आहे. सर्व रुग्णालयांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत.  

नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनची यादी गुलदस्त्यात 
नवी मुंबई : शहरातील कंटेन्मेंट झोन व हॉटस्पाॅटची माहिती प्रसारित करणे महानगरपालिकेने थांबविले आहे. संबंधित ठिकाणी सूचना फलकही लावण्यात येत नाहीत. घरामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती सोसायटीला नसते. सूचना फलक व इतर उपाययोजना करण्याकडेही महानगरपालिकेचे दुर्लक्ष हाेत आहे. 
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाच्या २७ मार्चच्या आदेशावरून महानगरपालिकेने हॉटस्पॉट व कंटेन्मेंट झाेनमध्ये १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे; परंतु शहरात नक्की किती व  कोणते हॉटस्पॉट आहेत व कंटेन्मेंट झोन कुठे आहेत याविषयी माहिती पालिका नागरिकांपर्यंत पोहोचवत नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रसारमाध्यमांनाही याविषयी माहिती पाठविणे बंद झाले आहे. ज्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहे तेथे सूचना फलक लावणे आवश्यक आहे. संबंधित सोसायटीच्या प्रवेशद्वारावर त्याविषयी माहिती देणे आवश्यक आहे. हॉटस्पॉट असलेल्या परिसरामध्येही सूचना फलक लावणे आवश्यक आहे. आवश्यक त्या रोडवर बॅरिकेडस्‌ही लावणे आवश्यक आहे; परंतु सद्य:स्थितीध्ये मनपा प्रशासनाकडून सूचना फलक लावण्याकडे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या इमारतीमध्ये रुग्ण सापडल्यानंतर त्याविषयी माहिती सोसायटीलाही देण्यात येत नाही. 
 झोपडपट्टी परिसरात पुन्हा कोरोना वाढू लागला आहे. त्या परिसरामध्येही बॅरकेडस्‌ लावणे व इतर उपाययोजना करण्यात येत नाहीत. यामुळे मनपाचे कंटेन्मेंट झोन व हॉटस्पॉट फक्त कागदावरच राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती होत नसल्यामुळे धोका असलेल्या ठिकाणांमध्येही नागरिकांची बिनधास्त ये-जा सुरू असल्याचे निदर्शनास  येत आहे.

Web Title: coronavirus: Hospital numbers should be given on dashboard, demand of city citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.