नवी मुंबई : लॉकडाउनमुळे सर्वच उद्योग ठप्प पडले आहेत. याचा सर्वाधिक फटका बांधकाम उद्योगाला बसला आहे. सिडकोच्या ‘नैना’ क्षेत्रात सुरू असलेले लहान-मोठे शेकडो बांधकाम प्रकल्प बंद पडले आहेत. विविध वित्तीय संस्थांकडून प्रकल्पासाठी घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे हप्ते भरताना कसरत होत असल्याने विकासक हवालदिल झाले आहेत.बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून सिडकोच्या ‘नैना’ क्षेत्राकडे पाहिले जाते. विविध कारणांमुळे रखडलेल्या या क्षेत्राचा विकास आता टप्प्यात आला आहे. लॅण्ड पुलिंग योजनेअंतर्गत सिडकोने नगररचना परियोजनेच्या माध्यमातून ‘नैना’च्या पहिल्या टप्प्यात विकासकामांना सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ११ टाउनशिप उभारले जाणार आहेत. त्याशिवाय अनेक खासगी विकासकांनी ‘नैना’ची रीतसर परवानगी घेऊन मोठमोठे गृहप्रकल्प प्रस्तावित केले आहेत. यापैकी अनेक प्रकल्पांची कामेही सुरू झाली आहेत. शेकडो लोकांनी येथे घरांसाठी नोंदणी केली आहे. महारेराच्या निर्देशानुसार निर्धारित वेळेत ग्राहकांना घरांचा ताबा देणे बंधनकारक आहे; परंतु लॉकडाउनमुळे या सर्वच प्रक्रियेला खीळ बसली आहे. केंद्र शासनाने लॉकडाउनचे नियम शिथिल करून बांधकाम प्रकल्पांच्या कांमाना मंजुरी दिली आहे. त्यानुसार काही ठिकाणी कामाला सुरुवातही करण्यात आली. मात्र, परप्रांतीय मजुरांच्या स्थलांतरामुळे या कामांना पुन्हा खीळ बसली आहे. मजुरांअभावी अनेक बांधकाम प्रकल्पांची कामे बंद करण्यात आली आहेत.सध्या परप्रांतीय मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे. हातातील कामे सोडून मजूर स्थलांतराचे अर्ज भरण्यासाठी धावत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात या प्रकल्पांना मजूर उपलब्ध होण्याची शक्यता कमीच असल्याने विकासक आणि गुंतवणूकदार धास्तावले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत किती दिवस प्रकल्प बंद ठेवायचे, असा सवाल विकासकांना सतावत आहे. शिवाय लॉकडाउननंतर परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. मजुरांचा तुटवडा तर असेलच. त्यासोबत वित्त पुरवठा आणि इतर संबंधित अडचणींचा सामना विकासकांना करावा लागणार आहे.ठोस उपाययोजना करण्याची मागणीअगोदरच अडचणीत असलेला बांधकाम उद्योग आणखी संकटात सापडला आहे. लॉकडाउननंतर यात आणखी भर पडणार आहे. मजुरांचा संभाव्य तुटवडा ही प्रमुख समस्या असली तरी भाग भांडवलाचे प्रश्न गंभीर स्वरूप धारण करणार आहेत. त्यामुळे या उद्योगाला तारण्यासाठी राज्य शासनाने आतापासूनच ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ‘नैना’ बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी केली आहे.
coronavirus: मजुरांच्या स्थलांतरामुळे शेकडो बांधकाम प्रकल्प ठप्प; विकासक, भांडवलदार हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 1:55 AM