नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईमध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. असे असले तरी प्रशासनाने मार्केट सुरूच ठेवण्याचा हट्ट धरल्याने शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. भाजीसह फळमार्केट तत्काळ बंद न केल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये बुधवारी एकाच दिवशी २५ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. मार्केटमुळे कोपरखैरणे, वाशी, नेरुळ, घणसोली व तुर्भे परिसरात कोरोनाचा प्रसार झाला आहे. ६ मेपर्यंत थेट मार्केटमध्ये ६५ व रुग्णांच्या संपर्कामुळे ४३ जणांना लागण झाली असून, एपीएमसीशी संबंधित रुग्ण संख्या १०८ वर पोहोचली आहे. लॉकडाउनसह कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या सर्व नियमांचे एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. पाच मार्केटमध्ये प्रतिदिन १० ते १२ हजार नागरिक उपस्थित राहतात. काही वेळा ही संख्या २० हजारपर्यंत जाते. भाजीपाला व फळ मार्केटमध्ये सर्वाधिक गर्दी होत असून मार्केटमध्ये वास्तव्यास असलेल्या परराज्यातील कामगारांकडून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचाही योग्य प्रकारे वापर केला जात नाही. या सर्वांमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. माथाडी कामगार व व्यापारी संघटनांनी मार्केट बंद करण्याची मागणी वारंवार केली असूनही शासनाने बाजारपेठा सुरूच ठेवण्याचा अट्टाहास कायम ठेवला आहे. त्याचे गंभीर परिणाम होऊ लागले आहेत.
नवी मुंबईमधील नागरिकांनीही बाजार समिती बंद करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरून याविषयी मोहीम राबविली जात आहे. महापौर जयवंत सुतार यांनीही शासनाला पत्र पाठविले आहे. शासनाने तत्काळ मार्केट बंद न केल्यास राज्यपाल व राष्ट्रपतींकडेही पाठपुरावा केला जाणार आहे. अनेक नगरसेवकांनीही मार्केट बंद ठेवण्याची मागणी केली आहे. एखाद्या गृहनिर्माण सोसायटीत कोरोना रुग्ण सापडला की संपूर्ण सोसायटी सील केली जाते. मग एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडूनही मार्केट सील का केलेजात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.एपीएमसीत रुग्णांची संख्या वाढत आहे. शासनाने किमान आठ दिवस मार्केट बंद ठेवून सर्वांची आरोग्य तपासणी करावी. मार्केटमध्ये माल न आणता परस्पर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे. प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. - संजय पानसरे,संचालक, फळ मार्केटभाजीपाला मार्केटमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. सर्वांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. काही दिवस मार्केट बंद ठेवणे आवश्यक असून, याविषयी शासनाने योग्य निर्णय घ्यावा. - शंकर पिंगळे, संचालक, भाजी मार्केटमार्केटमुळे तुर्भे व इतर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी एपीएमसी बंद करणे आवश्यक आहे.- सी. आर. पाटील, माजी नगरसेवक व माथाडी नेते