coronavirus: पनवेलमध्ये घरीच उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 02:37 AM2021-03-30T02:37:15+5:302021-03-30T02:39:00+5:30
coronavirus in Panvel : कोरोनाला वर्षपूर्ती झाली असली तरी कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, एक दिलासादायक बाब समोर आली असून कोरोनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
पनवेल : कोरोनाला वर्षपूर्ती झाली असली तरी कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, एक दिलासादायक बाब समोर आली असून कोरोनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या पालिका क्षेत्रात २४०० कोविडबाधित रुग्ण असून यापैकी केवळ २३० रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोना आजार बरा होत असून मोठ्या संख्येने कोरोनाबाधित घरीच बरे होत आहेत.
सुरुवातीच्या काळात कोविडबाबत प्रचंड भीती निर्माण झाली होती. प्रत्येक जण कोविडची बाधा होताच रुग्णालयात धाव घेत होता. अशा परिस्थितीत सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात मोठ्या जिकिरीने रुग्णांना बेड मिळत असत. रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीत राहिल्याशिवाय आपण बरे होणार नाही, अशी भावना अनेकांची झाली होती.
मात्र वर्षपूर्तीनंतर कोरोना आजार बरा होतो ही भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. रुग्णालयापेक्षा घरीदेखील आजार बरा होत असल्याने मोठ्या संख्येने कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची टक्केवारी तब्बल ८७ वर पोहोचली आहे. कोविडची साथ नियंत्रणात आणण्यासाठी शासनामार्फत विविध प्रयत्न सुरू आहेत. पालिका क्षेत्रात रात्री संचारबंदीदेखील सुरू झाली असून, नागरिकांनी शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजच्या घडीला कोरोनाबाधितांचा आकडा ३१,८८८ पर्यंत पोहोचला आहे. यापैकी ३४,९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर ६६९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोना आजार बरा होतो. कोविडची लक्षणे निदर्शनास आल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. लक्षणे आढळल्यास ती अंगावर न काढल्यास कोविडमधून आपली नक्कीच मुक्तता होईल.
- डॉ. आनंद गोसावी (वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका)