नवी मुंबई : कोरोना रुग्णांसाठी बेड्सच्या उपलब्धतेची माहिती विनाविलंब मिळावी, यासाठी महानगरपालिकेने रिअल टाइम अपडेट डॅशबोर्ड कार्यान्वित केला आहे. यामुळे एका क्लिकवर रुग्णालयनिहाय सविस्तर माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबईमध्ये जवळपास साडेतीन हजार रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांवर योग्य उपचार व्हावे, यासाठी महानगरपालिकेने त्रिस्तरीय रचना केली आहे. कोविड केअर सेंटर, हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड सेंटर तयार केली आहेत. शहरात बेड्सची संख्या पुरेशी आहे, परंतु नक्की कोणत्या रुग्णालयात कोणत्या प्रकारचे बेड्स उपलब्ध आहेत, याविषयी तत्काळ माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय होत होती. रुग्णालयात गेल्यानंतर तेथे जागा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी महानगरपालिकेने रिअल टाइम अपडेट डॅशबोर्ड कार्यान्वित केला आहे. एमएमएमसी हेल्थ फॅसिलिटीज डॉट कॉम या संकेतस्थळावर सर्व रुग्णालयनिहाय तपशील देण्यात आला आहे.
शहरात नवीन रुग्णांसाठी बेड्स कमी पडू नयेत, यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आयसीयू बेड्सची कमतरता दूर करण्यासाठी नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाशी यापूर्वीच करार करण्यात आला आहे. तुर्भेमधील राधास्वामी सत्संग आश्रम येथे ४५० आॅक्सिजन बेड्स, एक्स्पोर्ट भवन एपीएमसी येथे ४७५ आॅक्सिजन बेड्सची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.वाशीत ६०० आॅक्सिजन बेड्स : वाशीमधील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ६०० आॅक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आयसीयू बेड्सची कमतरता दूर करण्यासाठी नेरुळ येथील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाशी यापूर्वीच करार करण्यात आला आहे.