Coronavirus : खारघरमधील विलगीकरण केंद्रात ३५ जण देखरेखीखाली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:08 AM2020-03-17T02:08:13+5:302020-03-17T02:10:36+5:30

पनवेल : परदेशातून भारतात दाखल झालेल्या पनवेलमधील रहिवाशांना पनवेल महापालिकेकडून खारघर शहरातील ग्रामविकास भवनातील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. ...

Coronavirus : At Kharghar Isolation Center, 35 are under supervision | Coronavirus : खारघरमधील विलगीकरण केंद्रात ३५ जण देखरेखीखाली  

Coronavirus : खारघरमधील विलगीकरण केंद्रात ३५ जण देखरेखीखाली  

Next

पनवेल : परदेशातून भारतात दाखल झालेल्या पनवेलमधील रहिवाशांना पनवेल महापालिकेकडून खारघर शहरातील ग्रामविकास भवनातील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. संबंधित नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरी एकूण १४ दिवस या ३५ नागरिकांना देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव १४ दिवसांपर्यंत होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी म्हणून पनवेल महापालिकेने त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. यामध्ये बहुतांशी नागरिक हे पनवेल तालुक्यातील आहेत, तर काही नागरिक पुण्यातील आहेत. पनवेल तालुक्यातील काही टेनिस, क्रिकेटपटू दुबई येथे स्पर्धेसाठी गेले होते. त्यापैकी बहुतांशी क्रिकेटपटूंचा यामध्ये समावेश आहे. मात्र पालिकेने उभारलेल्या विलगीकरण केंद्रात कोणत्याच सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप या नागरिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केला. वेळेवर नाश्ता देण्यात आला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. दरम्यान, ज्या ग्रामविकास भवनात नागरिकांना ठेवण्यात आले आहे, त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी या ठिकाणाहून पळ काढला होता. संबंधित नागरिक कोरोना संशयित असल्याचा समज येथील कर्मचाऱ्यांना झाल्याने त्यांनी पालिका प्रशासनासोबत असहकाराची भूमिका घेतली होती. मात्र सोमवारी हे कर्मचारी कामावर रूजू झाल्याचे दिसले. ग्रामविकास भवनामध्ये कोणी ये-जा करू नये म्हणून सतर्कता म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील शाळा, महाविद्यालये, मॉल्स, चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद ठेवल्याने शहरात बहुतांश ठिकाणी सामसूम आहे. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी मास्क तसेच हँड सॅनिटायझर खरेदीसाठी विविध मेडिकलमध्ये धाव घेतली. मात्र अनेक ठिकाणी मास्कचा तुटवडा भासत असून काही दुकानदार चढ्या दराने वस्तूंची विक्री करीत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्याय येत आहे.
ग्रामविकास भवनामध्ये ठेवण्यात आलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची कोरोनाची लागण झालेली नाही. त्यांना केवळ देखरेखीत १४ दिवस ठेवण्यात आल्याचे आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले. अफवा पसरविणाºया नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही देशमुख त्यांनी या वेळी सांगितले.

देशी-विदेशी पर्यटकांची माहिती देण्याच्या सूचना
पनवेल परिसरातील पर्यटक देशात तसेच विदेशात पर्यटनासाठी गेले असल्यास त्याची माहिती पनवेल महापालिकेला द्या, नव्याने पर्यटक सहलींचे आयोजन शक्यतो टाळण्याच्या सूचना पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी पनवेल परिसरातील ट्रॅव्हल्स एजंटना दिल्या आहेत. तशा आशयाचे पत्र संबंधित ट्रॅव्हल्स एजंटना देण्यात आले आहे.

पालिकेने उभारलेल्या विलगीकरण केंद्रात कोणत्याच सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप नागरिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केला. वेळेवर नाश्ता, पाणी देण्यात आले नसल्याचा आरोप विलगीकरण केंद्रातील रहिवाशांनी आपल्या कुटुंबीयांना दूरध्वनीद्वारे केला.

उपजिल्हा रुग्णालयात ७० जणांची तपासणी
पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ९ ते १६ तारखेपर्यंत ७० जणांनी कोरोनाच्या अनुषंगाने आपली तपासणी केली आहे. यापैकी परदेशातून आलेल्या ४९ नागरिकांचा समावेश आहे तर उर्वरित २१ नागरिक स्थानिक रहिवासी आहेत.

Web Title: Coronavirus : At Kharghar Isolation Center, 35 are under supervision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.