Coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कोकणाला १५ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 02:24 AM2020-03-18T02:24:22+5:302020-03-18T02:24:43+5:30
कोकण विभागीय क्षेत्रात कोरोनाविषयी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी सीबीडी येथील कोकणभवन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दौंड यांनी ही माहिती दिली.
नवी मुंबई : कोकण विभागातील सात जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्याचे संबंधित जिल्ह्यांना वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.
कोकण विभागीय क्षेत्रात कोरोनाविषयी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी सीबीडी येथील कोकणभवन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दौंड यांनी ही माहिती दिली. कोकण विभागातील सात जिल्ह्यांतील महसूल, पोलीस, नगरपालिका आणि ग्रामपंचायत पातळीवर यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत. सोमवारपासून कोकणातील महत्त्वाची देवस्थाने भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. या देवस्थानांत सध्या केवळ पूजा करण्याची अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती दौंड यांनी दिली. विमानतळ आणि जेएनपीटी येथे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. तसेच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन वैद्यकीय तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली असून या ठिकाणी बाहेरून येणाºया वाहनचालकांची तपासणी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. कोकण विभागात अनेक ठिकाणी पालखी सोहळा, यात्रा, शोभायात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात तेदेखील स्थानिक स्तरावर बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही र्दौड यांनी या वेळी स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेला उपायुक्त (महसूल) सिधाराम सालीमठ, उपायुक्त (पुरवठा) शिवाजी कादबाने, डॉ. गणेश धुमाळ, डॉ. बी.जी. फाळके आदी उपस्थित होते.