Coronavirus: वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात कोविड रुग्णालयाचे काम सुरू;पालकमंत्र्यांकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 02:03 AM2020-05-09T02:03:46+5:302020-05-09T02:03:53+5:30
नवी मुंबईतही ११०० बेड्सचे रुग्णालय लवकर उभारण्याचे निर्देश शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिले आहेत.
नवी मुंबई : वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्याचे काम सुरू झाले आहे. नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाचा आढावा घेतला.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून रुग्णालयाची उभारणी होणार आहे. तब्बल ११०० बेड्सच्या रुग्णालयात डायलिसिस सेंटर, लॅब, आॅक्सिजन, एक्स-रे अशा सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास वैद्यकीय क्षमता अपुरी पडू नये, यासाठी अनेक ठिकाणी तात्पुरती रुग्णालये उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात १००० बेड्सचे रुग्णालय उभारण्याचे काम प्रगतिपथावर असून, ठाण्यातही १००० बेड्सचे रुग्णालय उभारण्यात येत आहे.
आढावा बैठकीत आवश्यक सोयी-सुविधांवर भर
नवी मुंबईतही ११०० बेड्सचे रुग्णालय लवकर उभारण्याचे निर्देश शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिले आहेत. पालकमंत्र्यांनी गुरुवारी नवी मुंबईत आढावा बैठक घेतली. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील या रुग्णालयांमुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळेल, तसेच संपूर्ण एमएमआर परिसरात आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.