coronavirus: लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांवर आर्थिक संकट, उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:00 AM2020-07-11T01:00:34+5:302020-07-11T01:00:41+5:30
नवी मुंबई : लॉकडाऊनचा परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मोठ्या प्रमाणात झाला असून, उपजीविका बंद असल्याने आर्थिक संकट कोसळले ...
नवी मुंबई : लॉकडाऊनचा परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मोठ्या प्रमाणात झाला असून, उपजीविका बंद असल्याने आर्थिक संकट कोसळले असून, उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा चालकांना सावरण्यासाठी शासनाने उपयोजना राबविण्याची मागणी रिक्षा, टॅक्सी चालक मालक संघटनांनी केली आहे.
नवी मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत रिक्षांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले असून, रिक्षा व्यवसाय हे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. अनेकांनी रिक्षाचा परवाना काढून रिक्षाच्या खरेदीसाठी बँकांकडून कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केल्या आहेत, तर अनेक जण रिक्षा भाड्याने घेऊन व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, घरभाडे, औषधोपचार, मुलांचे शिक्षण आदी सर्वच अवलंबून आहे. यामुळे कर्जाचे हप्ते, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरभाडे, विद्युत बिल, औषधोपचार असे अनेक प्रश्न रिक्षा चालकांपुढे निर्माण झाले आहेत. सुरुवातीला घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक संघटना, समाजसेवकांच्या वतीने अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे हातावर पोट अवलंबून असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. शासनाच्या माध्यमातून काही उपायोजना करून आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
यामध्ये प्रामुख्याने थकलेल्या कर्जाच्या हप्त्याचे व्याज माफ करून थकीत हप्ते इन्शुरन्स कंपन्यांकडून घेण्यात यावेत, तसेच पुढील काळातील हप्ते भरण्यासाठी वाढीव मुदत देण्यात यावी, तसेच रिक्षा, टॅक्सीची पासिंग करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशा मागण्या संघटनांच्या वतीने करण्यात येत आहेत.
लॉकडाऊनमुळे रिक्षा व टॅक्सी चालकांचे उत्पन्न पूर्ण बंद असल्याने थकीत हप्ते भरणे शक्य होणार नाही. यासाठी या थकीत हप्त्यांचे व्याज माफ करून इन्शुरन्स कंपन्यांपासून हप्त्यांचा भरणा करण्यात यावा, पुढील हप्ते भरण्यासाठी, तसेच पासिंगसाठीही मुदतवाढ मिळावी, यासाठी शासनाने आदेश काढावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संबंधित विभागांच्या प्रमुख नेत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलीप आमले, (अध्यक्ष नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था)