CoronaVirus Lockdown : नवी मुंबईकर झाले कडकडीत ‘लॉक’, दिघा ते बेलापूरपर्यंत शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 06:40 AM2021-04-11T06:40:52+5:302021-04-11T06:41:24+5:30

नवी मुंबईमध्ये प्रतिदिन सरासरी १ हजार रुग्ण वाढू लागले आहेत. सरासरी चार जणांचा मृत्यू होऊ लागला आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नाहीत.

CoronaVirus Lockdown: Navi Mumbai residents have been locked up, from Digha to Belapur | CoronaVirus Lockdown : नवी मुंबईकर झाले कडकडीत ‘लॉक’, दिघा ते बेलापूरपर्यंत शुकशुकाट

CoronaVirus Lockdown : नवी मुंबईकर झाले कडकडीत ‘लॉक’, दिघा ते बेलापूरपर्यंत शुकशुकाट

googlenewsNext

नवी मुंबई : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लागू केलेल्या कडक निर्बंधांचे शनिवारी नवी मुंबईकरांनी काटेकोरपणे पालन केले. दिघा ते बेलापूरदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद होती. शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. महानगरपालिका व पोलिसांचे पथक शहरभर फिरून नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन करत होते. पामबीच रोड, ठाणे-बेलापूर रस्ता व सायन - पनवेल महामार्गावरही वाहनांची संख्या कमी झाल्याचे चित्र होते.             
नवी मुंबईमध्ये प्रतिदिन सरासरी १ हजार रुग्ण वाढू लागले आहेत. सरासरी चार जणांचा मृत्यू होऊ लागला आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ब्रेक द चेन अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शनिवार व रविवारी कडक निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांचे शहरवासीयांनी काटेकोरपणे पालन केल्याचे चित्र शनिवारी दिसले. पहाटेपासून पोलिसांनी व पालिकेच्या पथकांनी शहरात सर्वत्र फिरून महत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यास सुरुवात केली. यामुळे मेडिकल, दूध, किराणा, भाजीपाला या अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. अनेक ठिकाणी किराणा मालाची दुकानेही बंद  होती.
शहरातील खाद्यपदार्थ विक्रेते व इतर फेरीवाल्यांनाही त्यांचे व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामुळे सायंकाळपर्यंत बहुतांश रस्ते, पदपथ, मार्केट परिसरात शुकशुकाट होता. बेलापूर, सीवूड, नेरूळ, जुईनगर, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली ते दिघापर्यंत सर्वच परिसरात बहुतांश दुकाने बंद असल्याचे दिसले. रेल्वे स्टेशनबाहेरही शुकशुकाट होता. बाजार समितीमध्येही आवक कमी झाली होती. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे पोलीस व महानगरपालिका प्रशासनानेही सर्वांचे आभार मानले. (अधिक वृत्त - पान ४)

कोरोनाच्या भीतीने दोन दिवसाचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे रेल्वे, बस वाहतूक व्यतिरिक्त अनेक खासगी वाहने फारशी धावत नसल्यामुळे वाहतुकीच्या रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. या शनिवारी ता. १० एप्रिल रोजीच्या एका दिवसात नवी मुंबईतील सुमारे २७ हजार रिक्षा, आणि २ हजार टॅक्सी चालकांवर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे. अनेक रिक्षाचालक मालकांकडून मासिक भाडेतत्त्वावर रिक्षा भाड्याने चालवून कुटुंबाचा चरितार्थ करीत आहेत.  ऐरोली,दिघा,घणसोली, कोपरखैरणे परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता १०० टक्के व्यापाऱ्यांनी बंद पाळला.

पेट्रोलपंप सुरु होते. मात्र वाहनांची संख्या कमी असल्यामुळे इंधन भरण्यासाठी फारशी वाहने न आल्यामुळे पंप चालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या नुकसान सहन करावे लागले, असे महापे, ऐरोली आणि घणसोली येथील पेट्रोलपंप मालकांचे म्हणणे आहे. वाहतुकीसाठी रेल्वे, बसेस सुरु होत्या मात्र प्रत्येक बसमध्ये चार ते पाच प्रवाशी प्रवास करताना दिसून आले. महापे,पावणे,खैरणे,ऐरोली, रबाले,नेरूळ आणि तुर्भे एमआयडीसीत अनेक लहान मोठ्या कंपन्यामध्ये काम बंद ठेवण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

नागरिकांनी दिला चांगला प्रतिसाद
पनवेल पालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ खारघर, प्रभाग समिती ‘ब’ कळंबोली, प्रभाग समिती ‘क’ कामोठे, प्रभाग समिती ‘ड’ पनवेल मधील मासळी बाजार, तसेच अत्यावश्यक सेवेच्या दुकानाशिवाय इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व दुकाने बंद होती. नागरिक घराबाहेर पडताना दिसत नव्हते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे सद्य:परिस्थितीमध्ये महत्त्वाचे आहे. नागरिकांनी पालिकेला यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले.

Web Title: CoronaVirus Lockdown: Navi Mumbai residents have been locked up, from Digha to Belapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.