नवी मुंबई/ पनवेल : कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत ३० एप्रील पर्यंत नवीन निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. परंतु निर्बंध सोमवारी रात्रीपासून लागू हाेणार की फक्त शनिवारी, रविवारी असणार याविषयी व्यवसायीक व नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. व्यवसायीक संघटना व सामाजीक, राजकीय कार्यर्तेही याविषयी प्रशासनाकडे दिवसभर विचारणा करत होते. नागरिकांमधील हा संभ्रम दूर करण्यासाठी पोलीस व महानगरपालिका प्रशासनाने सायंकाळी लाऊडस्पीकरवरून प्रत्येक विभागात जनजागृती सुरू केली व अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व अस्थापना बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले. शासनाच्या या निर्बंधांची माहिती अद्याप सर्वसामान्य नागरिक, रस्त्यावरील लहान व्यावसायिक आदींना नसल्याने या मिनिलॉकडाऊनबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. विशेषतः रोजंदारीवरील नोकरदार, फेरीवाले, रस्त्यावरील व्यावसायिकांमध्ये याबाबत कमालीची संभ्रमता निर्माण झालेली आहे. मागील वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेल्या या लहान व्यावसायिकांचा व्यवसाय काही दिवसांपूर्वीच सुरळीत झाला असताना पुन्हा अशा प्रकारे लॉकडाऊन उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने अनेक जणांवर एक प्रकारे मोठे संकट ओढवले आहे. पुन्हा एकदा निर्बंधांमुळे लहान व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. सोमवारपर्यंतदेखील काय सुरू राहणार आहे आणि काय बंद राहणार आहे, याबाबत अनेकांना काहीच माहिती नसल्याचे दिसून आले. नवी मुंबईमध्ये मैदाने, उद्याने पूर्णपणे बंद राज्य शासनाच्या सुचनेप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेनेही शहरात नवीन निर्बंधन लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व अस्थापना सोमवारी रात्रीपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय शहरातील सर्व उद्याने व मैदानेही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंधाविषयी माहिती देण्यासाठी विभागवाहन पथके तयार करण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या निर्बंधांत सलून पूर्णपणे बंद असल्याचे आम्ही टीव्हीवर बघितले. शासनाचे निर्देश आम्हाला अद्याप थेट प्राप्त झालेले नाहीत. मात्र केवळ सलूनच पूर्णपणे बंद केले जाणार असतील तर आम्ही आमची उपजीविका कशी भागवायची हे शासनाने आम्हाला सांगावे.- पप्पू खामकर, सलून व्यावसायिकशासनाच्या नव्या निर्बंधांबाबत काहीच माहिती नाही. मी रस्त्यावर दररोज वडापावचा व्यवसाय करतो. अनेक जणांनी मला पुन्हा लॉकडाऊन लागले असल्याचे सांगितले. याबाबत स्थानिक प्रशासनाने गोंधळाची परिस्थिती दूर करावी.- गणेश काळेल, वडापाव विक्रेतेठरावीक आस्थापना बंद केल्याने कोरोना थांबणार आहे का? निर्बंध लादून आस्थापना सुरू ठेवण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.- शैलेश जोशी, व्यापारी
CoronaVirus Lockdown News: नवी मुंबईसह पनवेलमध्ये संभ्रमावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 1:50 AM