CoronaVirus Lockdown News: परीक्षार्थींना प्रवासासाठी परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 01:31 AM2021-04-09T01:31:44+5:302021-04-09T01:31:53+5:30
प्रत्येक परीक्षार्थीच्या सोबत एकास प्रवासास परवानगी असेल.
पनवेल : ज्या परीक्षार्थींना स्पर्धा परीक्षा तसेच अन्य परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे, अशा परीक्षार्थींना वीकेण्ड लॉकडाऊनला म्हणजेच शनिवार-रविवार या कालावधीतसुद्धा आवश्यक प्रवास करण्यास परवानगी असेल. परीक्षार्थ्यांजवळील हॉल तिकीट हा प्रवासासाठीचा वैध पुरावा मानला जाईल. प्रत्येक परीक्षार्थीच्या सोबत एकास प्रवासास परवानगी असेल.
आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड १९चे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश लागू केले आहेत. त्यास अनुसरून काही अतिरिक्त सूचना जाहीर केल्या आहेत.
ऑनलाइन अन्नपुरवठा वितरित करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेतील अन्नपुरवठाधारक झोमॅटो, स्विगी आदींना आठवड्यातील सर्व दिवस चोवीस तास सेवा पुरविण्यास परवानगी आहे. याबरोबरच वीकेण्ड लॉकडाऊन दरम्यान हॉटेलमधून नागरिकांना स्वत: जाऊन पार्सल घेण्यास परवानगी असणार नाही. परंतु रेस्टॉरंट किंवा खानावळीमधून पार्सल पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. वीकेण्ड लॉकडाऊनच्या दरम्यान फळविक्रेत्यांसह रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांची विक्री सुरू ठेवता येतील, परंतु केवळ पार्सल सेवा देता येईल. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलजवळ उभे राहून खाता येणार नाही. डोळ्यांचे सर्व दवाखाने आणि त्या अनुषंगाने चष्म्यांची दुकाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या कालावधीत सुरू राहतील. हे आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालिकेने दिली आहे.