CoronaVirus Lockdown News: निर्बंध माहीत नसल्याने बहुतांश दुकाने सुरूच; नवी मुंबईमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 01:57 AM2021-04-07T01:57:43+5:302021-04-07T01:57:57+5:30

पोलिसांसह महानगरपालिकेच्या पथकांची जनजागृती सुरू

CoronaVirus Lockdown News: Most shops continue to be unaware of restrictions | CoronaVirus Lockdown News: निर्बंध माहीत नसल्याने बहुतांश दुकाने सुरूच; नवी मुंबईमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

CoronaVirus Lockdown News: निर्बंध माहीत नसल्याने बहुतांश दुकाने सुरूच; नवी मुंबईमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

googlenewsNext

नवी मुंबई :  ब्रेक द चेन अभियानांतर्गत शासनाने सोमवारी रात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत; परंतु नक्की काय बंद राहणार व काय सुरू राहणार, याची माहिती व्यावसायिकांना नसल्यामुळे दिवसभर संभ्रमाचे वातावरण होते. कपडे, हार्डवेअर, गॅरेज, फर्निचर व इतर अनेक दुकाने दिवसभर सुरूच होती. पोलीस व महानगरपालिकेची पथके दिवसभर शहरात गस्त घालून निर्बंध असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होती.      
      
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागावर ताण निर्माण झाला असून रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध होत नाही. यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकने कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. शासनाने लागू केलेले नवीन निर्बंध लागू केले आहेत; परंतु पहिल्याच दिवशी अनेक विभागांत नियम डावलून अनेक दुकाने सुरूच असल्याचे निदर्शनास येत होते. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत; परंतु हे आदेश नागरिकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. परिणामी सीबीडी, सिवूड, नेरूळ, जुईनगर, वाशी ते संपूर्ण शहरात अनेक दुकाने सुरूच होती. कपडे, हार्डवेअर, फर्निचर, चहा, चप्पल, गॅरेज व इतर दुकानेही सुरूच होती. अनेकांनी शटर अर्धे बंद ठेवले होते. ग्राहक आले की, त्यांना वस्तू दिल्या जात होत्या. ग्राहक गेले की, पुन्हा शटर अर्धे बंद करून घेतले जात होते.

   शहरातील अनेक फेरीवाल्यांनी त्यांचा व्यवसाय सुरूच ठेवला होता. भाजीपाला, फळे या व्यतिरिक्त इतर वस्तू विक्री करणारे फेरीवालेही सानपाडा व इतर ठिकाणी बिनधास्तपणे व्यवसाय करत होते. नागरिकांना नियमांची माहिती व्हावी यासाठी पोलीस व महानगरपालिकेचे पथक शहरभर गस्त घालत होते. लाऊडस्पीकरवरून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात होते. महामार्ग व शहरातील सर्व रत्यांवरून वाहतूक सुरू सुरळीत सुरू होती. 

या सुविधा सुरू राहणार
रुग्णालये, डायग्नोस्टिक सेेंटर, दवाखाने, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मसी, फार्मस्युटिकल कंपन्या व इतर वैद्यकीय सुविधा.
प्रवासी वाहतूक रेल्वे, टॅक्सी, रिक्षा व सार्वजनिक बस सुविधा.
विविध देशांचे राजदूत व त्यांच्या कार्यालयाशी संबंधित सेवा.
स्थानिक प्राधिकरणाद्वारे केली जाणारी मान्सूनपूर्व कामे.
स्थानिक प्राधिकरणाद्वारे परवानगी असलेल्या सर्व सार्वजनिक सुविधा.
पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने.
डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी माहिती तंत्रज्ञान संबंधित महत्त्वाच्या पायाभूत सुविधा व सेवा.
शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, ई कॉमर्स
शेतीविषयी कामे

या गोष्टी राहणार बंद
सर्व चौपाट्या, उद्याने, सार्वजनिक मैदाने पूर्णवेळ बंद राहणार.
अत्यावश्यक सुविधा वगळून सर्व दुकाने, बाजारपेठा, पानशॉप, मॉल्स, केश कर्तनालय, सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्ण दिवसभर बंद.
सर्च चित्रपटगृह, नाट्यगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद राहणार.
धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद राहणार.
शाळा, महाविद्यालये, क्लासेस बंद
सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांवर बंदी

या गोष्टींवर निर्बंध लागू राहतील
हॉटेल, रेस्टारंटमधून फक्त सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरू राहील.
लग्नसमारंभासाठी फक्त ५० नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी.
अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त २० नागरिकांना परवानगी.

Web Title: CoronaVirus Lockdown News: Most shops continue to be unaware of restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.